‘पेण अर्बन’ बँक घोटाळा; ईडीकडून २८९ कोटींची वसुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 07:05 IST2025-01-18T06:43:30+5:302025-01-18T07:05:22+5:30
या प्रकरणात अनेक गुंतवणूकदार देशोधडीला लागले होते. शुक्रवारी झालेली वसुली त्यांच्यासाठी दिलासा देणारी आहे.

‘पेण अर्बन’ बँक घोटाळा; ईडीकडून २८९ कोटींची वसुली
मुंबई : पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेतील ६५१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील २८९ कोटी ५४ लाख रुपयांची वसुली करण्यात ईडीला यश आले आहे. या बँकेतील २ लाख खातेदार आणि ४२ हजार गुंतवणूकदारांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणात अनेक गुंतवणूकदार देशोधडीला लागले होते. शुक्रवारी झालेली वसुली त्यांच्यासाठी दिलासा देणारी आहे.
राज्य सरकारने द महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ॲक्ट १९९९ अंतर्गत या पैशांच्या वसुलीसाठी एक समिती स्थापन केली होती. जप्त केलेली मालमत्ता या समितीच्या हवाली करण्यात आली आहे. या फसवणूक प्रकरणात सर्वप्रथम रायगड जिल्ह्यातील पेण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, यामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
बँकेच्या तत्कालीन संचालकांनी लेखापरीक्षकांसोबत संगनमत करत बँकेतील ६५१ कोटी रुपये लंपास केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. अधिकाऱ्यांनी अधिक परताव्यासाठी खासगी गुंतवणूक करत असल्याचे कारण देत हा पैसा बँकेतून काढत त्यातून वैयक्तिक मालमत्ता खरेदी केली, असा ठपका ईडीने तपासाअंती ठेवला आहे. संचालकांनी अफरातफर केलेल्या पैशांतून रायगड जिल्ह्यामध्ये ७० एकर जागेचा एक भूखंडदेखील २५ कोटी २० लाख रुपयांना खरेदी केला होता.