मुंबई : मुंबईतील झवेरी बाजारात ईडीने (ED) चार छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सराफा व्यापाऱ्याकडून ९२ किलो सोने आणि ३४० किलो चांदी जप्त केली आहे. ईडीकडून बुधवारी ही कारवाई करण्यात आली असून मेसर्स रक्षा बुलियन आणि मेसर्स क्लासिक मार्बल्सच्या ४ परिसरांमध्ये ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.
मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेडच्या प्रकरणातील मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात ही छापेमारी करण्यात आली. तत्पूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने, ८ मार्च २०१८ मध्ये मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेड विरुद्ध पीएमएलए कायदा २००२ च्या तरतुदींनुसार मनी लाँडरिंग प्रकरणाची नोंद केली होती. या कंपनीने अनेक बँकांना फसवून २२९६.५८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर हे पैसे विविध कंपन्यांच्या माध्यमातून असुरक्षित कर्ज आणि गुंतवणुकीच्या संदर्भात पैसे विविध खात्यांमध्ये पाठवले गेले. कर्ज घेण्याचा उद्देश वेगळा होता आणि अशा व्यवहारांसाठी कोणतेही करार केले गेलेले नव्हते. ईडीने यापूर्वी २०१९ मध्ये १५८.२६ कोटी जप्त केले होते.
बुधवारी या छापेमारी दरम्यान, मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारात खाजगी लॉकरच्या चाव्या मिळून आल्या, या खासगी लॉकर्सची झडती घेतली असता, ईडीच्या छापेमारीत योग्य नियमांचे पालन न करता व्यवहार केले जात होते. केवायसीचे पालन केले नाही, आवारात सीसीटीव्ही कॅमेरा बसवला नाही. आत आणि बाहेर नोंदीसाठी कोणतेही रजिस्टर ठेवण्यात नव्हते. लॉकर परिसराची झडती घेतली असता असे आढळून आले की, तेथे ७६१ लॉकर्स होते ज्यापैकी ३ मेसर्स रक्षा बुलियनचे होते. लॉकर्स चालवताना २ लॉकरमध्ये. ९१.५ किलो सोने आणि १५२ किलो चांदी सापडली आणि ती जप्त करण्यात आली. मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारातून अतिरिक्त १८८ किलो चांदीही जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत रु. ४७.७६ कोटी आहे.