'ईडी'कडून नीरव मोदीच्या 9 अलिशान गाड्या जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 01:02 PM2018-02-22T13:02:42+5:302018-02-22T13:05:53+5:30
जप्त केलेल्या नऊ कारची किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
मुंबई: पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) 11 हजार कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेला हिरेव्यापारी नीरव मोदीभोवती तपास यंत्रणांनी आवळलेला कारवाईचा फास आणखी घट्ट केला आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुरूवारी नीरव मोदीच्या आणखी काही मालमत्ता आणि कंपन्यांवर छापे टाकले. यावेळी 'ईडी'ने नीरव मोदीच्या 9 अलिशान गाड्या जप्त केल्या. काल सीबीआयनेही मोदीच्या अलिबागमधील अलिशान फार्म हाऊसलाही सील ठोकले होते.
दरम्यान, आज 'ईडी'कडून जप्त करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये एक रोल्ज रॉयस घोस्ट, दोन मर्सिडिज बेंझ जीएल ३५० सीडीआयएस, एक पोर्शे पनामेरा, तीन होंडा, एक टोयोटा फॉर्च्युनर आणि एका टोयोटा इनोव्हा गाडीचा समावेश आहे. जप्त केलेल्या नऊ कारची किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यातील रोल्ज रॉयस कारची किंमत सुमारे ६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. यासोबतच ईडीने नीरव मोदीचे म्युच्युअल फंड आणि शेअर्सही गोठवले आहेत. या शेअर्सची किंमत साधारण ७.८० कोटी रूपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते. तसेच या घोटाळ्यातील दुसरा आरोपी आणि नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सीच्या संपत्तीवरही ईडीची कारवाई सुरु आहे. ईडीने मेहुल चोक्सीच्या ग्रुपशी संबंधित ८६.७२ कोटींचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड्सही गोठवले आहेत.
ED seized 9 cars belonging to #NiravMod and his companies. These cars include one Rolls Royce Ghost, two Mercedes Benz GL 350 CDIs, one Porsche Panamera, 3 Honda cars, one Toyota Fortuner and one Toyota Innova. pic.twitter.com/Kfx0rkPrIW
— ANI (@ANI) February 22, 2018