मुंबई - काही महिन्यांपूर्वी जाहीर झालेल्या लोकसभेच्या निकालात, तसेच आयपीएल आणि अन्य क्रिकेटच्या सामन्यात ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या फेअर प्ले ॲप कंपनीशी निगडित २१९ कोटी ६६ लाख रुपयांची मालमत्ता सोमवारी ईडीने जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये डीमॅटमध्ये असलेले समभाग, मुंबई, ठाणे, दमण, अजमेर (राजस्थान), कच्छ (गुजरात) येथे असलेले भूखंड, फ्लॅट, गोडाऊन, आदी मालमत्तेचा समावेश आहे.
एकीकडे ॲपच्या माध्यमातून सट्टेबाजी करतानाच दुसरीकडे कंपनीच्या वेबसाईटवरून आयपीएल, तसेच क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण अवैधरीत्या सुरू होते. त्यानंतर क्रिकेट सामन्याच्या प्रसारणाचे हक्क असलेल्या व्हायकॉम-१८ या कंपनीने फेअर प्लेच्या वेबसाईटवरून अवैधरीत्या क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण होत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेकडे केली होती. तसेच, यामुळे त्यांच्या १०० कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचेदेखील नमूद केले. त्यानंतर या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात कंपनीने दुबई व अन्य देशांत पैशांचे व्यवहार केल्याचे दिसून आले. ईडीच्या तपासांत जशी माहिती पुढे येत आहे, तसतशा या मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. दरम्यान, यापूर्वी १२ जून, २७ ऑगस्ट, २७ सप्टेंबर अशा तीन वेळा ईडीने कंपनीशी संबंधित ठिकाणी छापेमारी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ३३१ कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
ॲपद्वारे कोट्यवधी रुपये मिळवले
या प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने याचा तपास सुरू केला होता. क्रिश शहा हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असून, त्याने फेअर प्लेचे तांत्रिक व अन्य कामकाज नीट चालावे यासाठी युरोपातील ‘माल्टा’ या देशात काही कंपन्या स्थापन केल्या होत्या. हे ॲप तो दुबईतून चालवीत होता, तर सिद्धांत अय्यर नावाची व्यक्ती या ॲपचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत होती. त्यांनी या ॲपद्वारे कोट्यवधी रुपये मिळवत त्याद्वारे अनेक ठिकाणी मालमत्तांची खरेदी केली आहे.