लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विविध तीन वाहिन्यांच्या मुंबईसह दिल्ली, गुडगाव व इंदूर येथील मालमत्तांवर छापे टाकले. त्यांच्या मालकीची एकूण ३२ कोटींची संपत्ती जप्त केली. टीआरपी घोटाळ्याप्रकरणी फक्त मराठी, बॉक्स सिनेमा व महा मूव्ही या वाहिन्यांचे भूखंड, फ्लॅट व व्यावसायिक गाळे ताब्यात घेण्यात आल्याचे ईडीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुंबई पोलिसांनी उघड केलेल्या टीआरपी घोटाळ्यातील मुख्य आरोपी रिपब्लिक चॅनलवर मात्र कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वाहिन्यांचे रँकिंग आणि त्यांचे प्रेक्षक (टीआरपी) निश्चित करणाऱ्या हंसा रिसर्च या संस्थेच्या माजी कर्मचाऱ्यांनी या वाहिनीच्या चालकांशी मिळून कट केला. बनावट रँकिंग मिळवून त्याच्या आधारे जाहिरातीतून कोट्यवधींचा महसूल मिळविल्याचे मुंबई पोलिसांनी चव्हाट्यावर आणले आहे. त्याबाबत अन्य राज्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीकडून तपास करण्यात येत आहे. त्यांनी एकूण ४६ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी देशभरात विविध ठिकाणी जमवलेली मालमत्ता जप्त केली जात आहे. त्यानुसार तीनही वाहिन्यांच्या मुंबई, दिल्ली, गुडगाव व इंदूर येथील मालमत्ता जप्त केल्याचे ईडीने जाहीर केले आहे. मात्र, रिपब्लिक चॅनलवर मात्र कारवाई करण्याचे ईडीने टाळले आहे.
हंस रिसर्चच्या काही कर्मचाऱ्यांनी ज्या घरांमध्ये बीएआरसी बार-ओ-मीटर स्थापित आहेत त्या घरांची माहिती उघडकीस आणली आहे आणि चॅनलने स्वत:च्या फायद्यासाठी ही माहिती वापरण्याचा प्रयत्न केला होता. चॅनल्सनी घरांना त्यांची चॅनल्स पाहण्यासाठी लाच दिली, ज्यायोगे बीएआरसीने मोजल्याप्रमाणे त्यांचे दर्शकत्व कपटीने वाढविले. या दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील दूरदर्शन रेटिंग पॉइंटस् (टीआरपी)चा चुकीचा फायदा करून घेण्यासाठी फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि महा मूव्ही याने फसवणूक करण्याचा विश्वासघात केला होता आणि विश्वासघात केल्याचा गुन्हा केला होता.