फेअर प्ले ॲपची आठ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 10:48 IST2025-01-17T10:48:32+5:302025-01-17T10:48:40+5:30
मुख्य सूत्रधार क्रिश शहाने फेअर प्लेचे कामकाज नीट चालावे यासाठी माल्टा या देशात काही कंपन्या स्थापन केल्या होत्या.

फेअर प्ले ॲपची आठ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
मुंबई : गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात तसेच आयपीएल आणि अन्य क्रिकेटच्या सामन्यात ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या फेअर प्ले ॲप कंपनीशी निगडित ८ कोटी ३७ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये दिल्ली व गुरगाव येथील फ्लॅट तसेच कार्यालयीन जागेचा समावेश आहे.
ॲपच्या माध्यमातून सट्टेबाजी करतानाच दुसरीकडे कंपनीच्या वेबसाइटवरून आयपीएल तसेच क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण अवैधरीत्या सुरू होते. त्यानंतर क्रिकेट सामन्याच्या प्रसारणाचे हक्क असलेल्या व्हायकॉम-१८ या कंपनीने फेअर प्लेच्या वेबसाइटवरून अवैधरीत्या क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण होत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेकडे केली होती.
तसेच, यामुळे त्यांच्या १०० कोटींच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे नमूद केले. त्यानंतर प्राथमिक तपासात या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने याचा तपास सुरू केला होता.
३४४ कोटींची मालमत्ता जप्त
मुख्य सूत्रधार क्रिश शहाने फेअर प्लेचे कामकाज नीट चालावे यासाठी माल्टा या देशात काही कंपन्या स्थापन केल्या होत्या. हे ॲप सिद्धांत अय्यर नावाची व्यक्ती या आर्थिक व्यवहार सांभाळत होती. आतापर्यंत ईडीने ३४४ कोटी १५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.