Join us

ईडीकडून ३१ कोटींचे विमान जप्त, थकीत कर्ज प्रकरणी संजय सिंंघल यांच्यावर ईडीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 6:23 AM

Sanjay Singhal : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानाने गुरुवारी दिल्ली ते जोधपूर या मार्गावर सायंकाळी उड्डाण केले होते.

मुंबई : तब्बल ४७ हजार कोटी रुपयांच्या थकीत कर्ज प्रकरणी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) भूषण पॉवर ॲण्ड स्टील कंपनीचे माजी अध्यक्ष संजय सिंघल यांच्या मालकीचे विमान गुरुवारी जप्त केले. सेसेना ५२५ ए सीएजे बनावटीच्या या आठ आसनी विमानाची किंमत ३१ कोटी रुपये इतकी आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानाने गुरुवारी दिल्ली ते जोधपूर या मार्गावर सायंकाळी उड्डाण केले होते. त्यानंतर त्याची जप्ती झाल्याचे समजते. उपलब्ध माहितीनुसार, सिंघल यांनी देशातील बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्था अशा एकूण ३३ संस्थांकडून तब्बल ४७ हजार २०४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

कर्जापोटी मिळालेले पैसे सिंघल यांनी विविध बनावट कंपन्यांच्या मार्फत वळवून त्याचा वैयक्तिक वापर केला. या बँका व अन्य वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्जही ‘जाणिवपूर्वक’ थकविले. या पार्श्वभूमीवर २०१८ मधे सर्वप्रथम सीबीआयने गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर एप्रिल २०१९ मधे ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीने लंडन, दिल्ली, मुंबई येथे कंपनीचे कार्यालय तसेच सिंघल यांच्या घरावर छापेमारी केली होती.

या छापेमारीमध्ये सिंघल यांची देश-परदेशातील सुमारे ४,४२० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली होती. ईडीने सिंघल यांना नोव्हेंबर २०१९ मध्ये अटक केली होती. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये दिल्ली न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. आजवर ईडीने केलेल्या कारवाईत प्रथमच विमान जप्त करण्यात आले आहे.

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयविमान