एड शीरनच्या कॉन्सर्टमुळे मुंबईकरांची ‘कोंडी’; ३५ हजार वाहने रस्त्यावर आल्याने ट्रॅफिक जॅम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 10:38 AM2024-03-18T10:38:27+5:302024-03-18T10:39:11+5:30
वाहतुकीचे नियोजन करताना वाहतूक पोलिसांची दमछाक झाली
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: प्रख्यात ब्रिटिश गायक एड शीरनच्या मुंबई, आय लव्ह द शेप ऑफ यू, थिंकिंंग आऊट लाऊड, बॅड हॅबिट्स... या प्रसिद्ध गाण्यांवर महालक्ष्मी रेसकोर्सवर हजारो मुंबईकर थिरकत असताना बाहेर मात्र वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे चित्र होते. तब्बल ३५ हजार चाहत्यांनी एकाचवेळी रेसकोर्सवर गर्दी केल्याने वाहतुकीचे नियोजन करताना वाहतूक पोलिसांची दमछाक झाली.
एडवर्ड शीरनच्या गाण्यांचा कार्यक्रम (कॉन्सर्ट) शनिवारी महालक्ष्मी रेसकोर्सवर पार पडला. या कार्यक्रमाला मुंबई व उपनगरांतील त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. कार्यक्रमस्थळी एकाचवेळी अनेक वाहने आल्याने सर्वत्र वाहतूककोंडीचे चित्र होते. वरळीकडे येणारी, सात रस्ताकडून हाजी अली, मलबार हिलकडे जाणाऱ्या वाहतुकीसह दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात कोंडीची समस्या निर्माण झाली. अनेकांनी वरळी नाका ते महालक्ष्मी, भायखळा स्थानकापर्यंत पायी जाणे पसंत केले. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात चाहते मंडळी येणार असल्याची माहिती असतानादेखील वाहतुकीचे योग्य नियोजन न केल्यामुळे हा फटका बसल्याचे मत चाहत्यांनी व्यक्त केले. बस, टॅक्सीच्या कोंडीमुळे नोकरदार वर्गालाही घरी पोहोचण्यास वेळ झाला.
लोकलने येण्याच्या होत्या सूचना, पण...
या परिसरात पार्किंग व्यवस्था नसल्याने चाहत्यांना लोकलने येण्याबाबत आयोजकांना सूचित करण्यात आले होते. आयोजकांनीही चाहत्यांना तसे आवाहन केले होते. एकाच वेळी हजारोंनी चाहते मंडळी वाहनांनी आल्याने रस्ता ब्लॉक झाला. प्रत्येकजण गेटसमोरच वाहन थांबवून आत जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. पश्चिम उपनगरातील चाहत्यांचे प्रमाण अधिक होते. त्यात प्रवेश करण्यासाठीही एकच मार्ग असल्याने एकाच वेळी वाहनांवर नियंत्रण आणताना अडचणी आल्याचे दक्षिण वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी सांगितले.
रुग्णवाहिका, वृद्धांना पोलिसांचा आधार
कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिका तसेच वृद्धांना, दिव्यांगांना पोलिसांचा आधार मिळाल्याचे दिसून आले. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कोंडीतून या वृद्धांना बाहेर काढताना दिसले.
चोरीची घटना नाही...
रेल्वे स्थानकासह महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच या कॉन्सर्टदरम्यान एकाही चोरीच्या घटनेची गेल्या दोन दिवसांत नोंद झाली नसल्याचे ताडदेव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक शेंडे यांनी सांगितले.