मुंबई :
येस बँकचे सहसंस्थापक राणा कपूर यांची जामिनावर सुटका करताना विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीच्या वर्तनावर ताशेरे ओढले. ईडी जामीन अर्जांवर जोरदार आक्षेप घेते. परंतु, खटला चालविण्यासाठी कोणतीही पावले उचलत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने ईडीला फटकारले.
ईडी फक्त जामीन अर्जांना जोरदार विरोध करते; परंतु, पीएमएलए कायद्याचे कलम ४४ (१) (सी) नुसार, खटला पुढे चालवण्यासाठी सक्रिय पाऊल उचलत नाही. अनेक कच्चे कैदी कारागृहात आहेत, अशा शब्दांत न्या. एम. जी. देशपांडे यांनी ईडीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
अर्जदाराचा अवाजवी तुरुंगवास अनिश्चित काळासाठी वाढविण्याबाबत न्यायालयाने ईडी व सीबीआयची कार्यप्रणाली स्वीकारल्यास तपासयंत्रणांच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन दिल्यासारखे होईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. तसेच या प्रकरणात एचडीआयएलचे प्रमोटर्स राकेश आणि सारंग वाधवान तसेच येस बँकेचे उच्चपदस्थ आरोपी असूनही त्यांना ईडीने अटक न केल्याबद्दल न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.
मूळ गुन्ह्याच्या प्रगतीबाबत ईडी अनभिज्ञ- कपूर यांच्यावर नोंदविण्यात आलेल्या मूळ गुन्ह्याच्या प्रगतीसंदर्भात ईडी अनभिज्ञ असणे धक्कादायक असल्याचे न्यायालयाने म्हटले. - मूळ गुन्ह्याची माहिती पीएमएलए न्यायालयाला दिल्याशिवाय खटला सुरू होऊ शकत नाही, याची माहिती असूनही ईडी केवळ आरोपांचा मसुदा सादर करत आहे.- आम्ही खटल्यासाठी तयार आहोत, हे भासवण्याचे काम ईडी करत आहे, असे न्यायालयाने राणा कपूर यांच्या जामीन आदेशात म्हटले आहे.