राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले असून आज सकाळी ११ वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईडीच्या समन्सनुसार अनिल देशमुख आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत.
अनिल देशमुखांचा पाय खोलात; पीए संजीव पलांडे, कुंदन शिंदेंना ईडीकडून अटक
ईडीकडून अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि खासगी सचिव संजीव पलांडे यांना रात्री उशीरा चौकशीनंतर अटक केली आहे. अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी काल छापेमारी केली होती. देशमुख यांच्यावर झालेल्या वसुलींच्या आरोपांप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी काल जवळपास ९ तास चौकशी केली होती.
अनिल देशमुख आणि काही इतर व्यक्तींच्या विरोधात ईडीनं गेल्याच महिन्यात मनी लाँड्रिंग कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयनं मुंबई हायकोर्टाच्या आदेशनुसार एका गुन्ह्याची नोंद करत सुरूवातीचा तपास केला होता. त्यानंतर ईडीनं गुन्हा नोंदवला. मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझेंना देशमुख यांनी हॉटेल, बार मालकांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता.