लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुण्यातील भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना सक्तवसुली संचलनालनालयाने (ईडी) समन्स बजाविले आहे. बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे.
यापूर्वी ८ जुलै रोजी एकनाथ खडसे यांची ईडी कार्यालयात तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली होती. पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड व्यवहार प्रकरणात जावई गिरीश चौधरी याच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली होती.
भोसरी येथील जमीन खरेदीप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी अटकेत आहे. याच प्रकरणी मंदाकिनी खडसे यांना ईडीने उद्या हजर होण्याची नोटीस बजावली आहे.
मंदाकिनी खडसे व त्यांचे जावई चौधरी यांनी भोसरी एमआयडीसीमध्ये खरेदी केलेल्या भूखंड वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भोसरी गैरव्यवहारप्रकरणी खडसे कुटुंब अडचणीत आले असतानाच, गेल्या आठवड्यात त्यांच्याशीच संबंधित असणाऱ्या मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाची माहिती मिळविण्यासाठी ईडीने जळगाव जिल्हा बँकेला नोटीस बजावली आहे. या बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे असल्याने राजकीय आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडालेली आहे.