Join us

परमबीर सिंग यांना ईडीचे समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:05 AM

लवकरच जबाब नोंदवणार : आरोग्याच्या समस्येमुळे मागितली वेळलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर असलेल्या ...

लवकरच जबाब नोंदवणार : आरोग्याच्या समस्येमुळे मागितली वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर असलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपाप्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवणार आहे. याबाबत सिंग यांना समन्स बजावण्यात आला आहे. मात्र आरोग्याच्या समस्येमुळे त्यांनी हजर राहण्यासाठी काही दिवसांचा अवधी मागितल्याचे समजते.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेकडे १०० कोटींची मागणी केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील बार, हॉटेल, रेस्टॉरंट मालकांकडून वसुली करण्याचा मार्ग देशमुखांनी सचिन वाझेला सांगितल्याचे सिंग यांनी पत्रात म्हटले होते. या पत्रामुळे देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पुढे सीबीआयने देशमुखांवर झालेल्या आरोपांची चौकशी करत गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात ईडीकडून तपास सुरू आहे. तपास करत असताना ईडीने देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरे तसेच कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले आहेत. त्याचबरोबर देशमुख यांचे दोन सचिव कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक केली. दोघेही ईडीच्या कोठडीत आहेत.

.................

वाझेचाही जबाब नोंदविणार

एनआयएच्या कोठडीत असलेल्या सचिन वाझेचा जबाब नोंदविण्यास ईडीला शुक्रवारी एनआयए कोर्टाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. शनिवारी ईडीचे अधिकारी तळोजा कारागृहात जाऊन वाझेचा जबाब नोंदवणार आहेत.