रणबीर कपूर ईडीच्या रडारवर; महादेव ॲप प्रकरण, ६ ऑक्टोबर रोजी चौकशी
By मनोज गडनीस | Published: October 4, 2023 09:42 PM2023-10-04T21:42:17+5:302023-10-04T21:43:26+5:30
त्या अनुषंगानेच त्याची चौकशी होणार आहे.
मनोज गडनीस, मुंबई - ऑनलाईन सट्टेबाजी ॲपच्या माध्यमातून सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या हवाला रॅकेटमुळे ईडीच्या रडारवर आलेल्या महादेव ॲपप्रकरणी आता अभिनेता रणबीर कपूर याची येत्या ६ ऑक्टोबर रोजी ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत. महादेव ॲप कंपनीच्या उपकंपनीच्या एका ॲपचे प्रमोशन रणबीर याने केले होते व त्यासाठी त्याने रोखीने मानधन स्वीकारले होते, असा ठपका ईडीने ठेवला असून त्या अनुषंगानेच त्याची चौकशी होणार आहे.
महादेव ॲप कंपनीचे हवाला रॅकेट उजेडात आल्यानंतर ईडीने कंपनीच्या संचालकांविरोधात मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. या ॲपच्या प्रमोशनमध्ये बॉलीवूडमधील अनेक नामवंत कलाकार गुंतले असल्याचीही माहिती पुढे आली होती.उपलब्ध माहितीनुसार, महादेव ॲप या कंपनीची स्थापना सौरभ चंद्राकर व उप्पल या दोघांनी केली होती. या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टेबाजी होत होती. भारत व अन्य देशांतून हजारो कोटी रुपये या ॲपमध्ये गुंतले आहेत व सुमारे पाच हजार कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून परदेशात फिरवण्यात आले होते. ही बाब उजेडात आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
या तपासादरम्यान महादेव ॲप व बॉलीवूडचे कनेक्शन देखील उजेडात आले. या कंपनीचा प्रवर्तक असलेल्या सौरभ चंद्राकर याचा फेब्रुवारी महिन्यात दुबईत आलीशान विवाह झाला होता. या करिता तब्बल २०० कोटी रुपये रोखीने खर्च करण्यात आले होते. या लग्नसोहळ्यासाठी बॉलीवूडमधील अनेक नामवंत कलाकार व गायकांनी हजेरी लावत आपले कलाविष्कार सादर केले होते.
याकरिता या सर्व कलाकारांनी रोखीने मानधन स्वीकारले होते व हा पैसा हवालाच्या माध्यमातून आल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. या लग्नसोहळ्याला उपस्थित राहून रोखीने मानधन स्वीकारणाऱ्या या कलाकारांची देखील लवकरच ईडीचे अधिकारी चौकशी करणार असल्याचे समजते. दरम्यान, २२ सप्टेंबर रोजी यापैकी काही कलाकाराच्या मॅनेजरच्या कार्यालयांवर ईडीने केलेल्या छापेमारी दरम्यान अडीच कोटी रुपयांची रोख जप्त करण्यात आली होती.