अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशीसाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत वर्षा राऊत यांना आज बोलावले होते, मात्र त्यांनी मुदतवाढ मगितल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा समन्स पाठवले आहे. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना 5 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. 4300 कोटी रुपयांच्या पीएमसी बँकेच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी हजर होण्यासाठी नवे समन्स बजावले असल्याचे ईडीच्या सुत्रांनी माहिती दिली.यापूर्वी पाठवलेले समन्स तहकूब करण्याची विनंती वर्षा यांनी केली होती आणि मुंबईतील केंद्रीय चौकशी एजन्सीकडे नवी तारीख मागितली होती.
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर आता शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते.
ईडीच्या नोटिसीच्या वृत्तानंतर संजय राऊत यांनी, ‘आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना,’ असे ट्विट करत एक प्रकारे आव्हान स्वीकारल्याचा इशारा दिला, तर नोटिसीबाबत माध्यमांनी विचारले असता, मला याची काहीही कल्पना नाही. माझ्यापर्यंत याबाबत काहीही माहिती नाही. जर घरी नोटीस आली असेल, तर मी स्वत: याबाबत पत्रकार परिषद घेईन आणि माहिती देईन, असे राऊत म्हणाले होते.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या स्थापनेसाठी वातावरणनिर्मिती करण्यामध्ये संजय राऊत यांनी मोठी भूमिका बजाविली होती. त्यानंतर गेले वर्षभर ते सातत्याने भाजप, पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठवीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी त्याबाबत टीकेची झोड उठविली आहे.
खडसे यांना भोसरी भूखंडप्रकरणी ३० डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यास समन्स बजावण्यात आले आहे.