लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुन्हा एकदा समन्स बजाविले आहे. १२ जानेवारीला त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. तसेच सेना आमदार प्रताप सरनाईक यांना टॉप सिक्युरिटीमधील कथित गैरव्यवहार प्रकरणी पुन्हा एकदा समन्स बजाविण्यात आल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.
वर्षा राऊत यांची चार जानेवारीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे साडेतीन तास चौकशी केली होती. पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या खात्यावरून वर्षा राऊत यांच्या खात्यावर ५५ लाख रुपये वर्ग करण्यात आले होते. तसेच त्यांच्या चार कंपन्यांतील भागीदारीच्या अनुषंगाने त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली होती. त्याबाबत अद्याप चौकशी पूर्ण न झाल्याने त्यांना पुन्हा कार्यालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. १२ जानेवारीला सकाळी हजर राहण्याचे समन्समध्ये नमूद केले आहे.
प्रताप सरनाईक व त्यांच्या कुटुंबीयांना अटक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ईडीला मज्जाव केला आहे. मात्र, त्यांच्यामागील चौकशीचा ससेमिरा कायम राहिला आहे. त्यांना बुधवारी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे त्यांना पुन्हा नवीन समन्स बजाविले आहे.