लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्टचा बुधवारी ईडीने औपचारिक ताबा घेतला. याप्रकरणी ४ जानेवारीला ईडीने केलेल्या छापेमारीमध्ये दापोली येथील मुरूडमधील ४२ गुंठे जमीन (किंमत २ कोटी ७३ लाख) आणि साई रिसॉर्ट (किंमत ७ कोटी ४६ लाख) आदी मालमत्तांची तात्पुरती जप्ती केली होती. मात्र, बुधवारी त्याचा औपचारिक ताबा ईडीने घेतला आहे.
दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने तपास सुरू होता. यामध्ये हे रिसॉर्ट सागरी नियंत्रण क्षेत्र-३ मध्ये येत असल्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय पर्यावरण विभागाने दापोली येथील न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. सरकारी यंत्रणेवर प्रभाव टाकत आणि सरकारी महसुलाचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत दापोली पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी शिवसेना नेते अनिल परब यांची जून महिन्यात चार वेळा चौकशी झाली होती.