मुंबई : विशेष सत्र न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करत उच्च न्यायालयाच्या विशेष सुटीकालीन खंडपीठाने १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा सोमवारी ताबा घेत पुन्हा चौकशी सुरू केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केलेल्या १०० कोटी वसुली, भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्राथमिक तपास करून गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. तर, याच गुन्ह्याच्या आधारे मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून तपास करत असलेल्या ईडीने १ नोव्हेंबरच्या रात्री देशमुखांना अटक केली. या आरोपाप्रकरणी त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे.
ईडीला देशमुख पिता-पुत्राची एकत्रित चौकशी करायची असल्याने त्यांनी देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश यालाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. मात्र, याबाबत ईडीकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. तर, अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी ऋषिकेश देशमुख यांना समन्स आले नसल्याचे सांगितले आहे.