Sanjay Raut : रात्री साडेदहा नंतर संजय राऊत यांची ईडी चौकशी करणार नाही, कोर्टात दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 03:56 PM2022-08-01T15:56:22+5:302022-08-01T16:22:55+5:30
Sanjay Raut : संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरगी आणि ईडीकडून हितेन वेणेगावकर यांनी कोर्टात युक्तिवाद केला.
मुंबई : मुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी दिवसभर चाललेल्या चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. एक हजार कोटींहून अधिकच्या घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांनी तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप आहे.काल दिवसभर राऊत यांची चौकशी केल्यानंतर ईडीने रात्री त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्यानंतर आज दुपारी वैद्यकीय तपासणीसाठी राऊत यांना जे जे रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले गेले. कोर्टाने राऊत यांना कोठडी सुनावली आहे. ईडीने आठ दिवसांची कोठडी मागितली आहे. मात्र, संजय राऊत यांच्या वकिलांनी कमीत कमी दिवसांची कोठडी कोर्टाने सुनवावी म्हणून युक्तिवाद केला होता. मात्र न्या. एम जी देशपांडे यांनी आठ दिवसांच्या कोठडीची गरज नसल्याचं सांगत तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. आता संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी ठोठावली आहे. तसेच ईडीने रात्री १०.३० नंतर संजय राऊत यांची चौकशी करणार नसल्याचं ईडीने कोर्टाला सांगितलं आहे.
संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरगी आणि ईडीकडून हितेन वेणेगावकर यांनी कोर्टात युक्तिवाद केला. संजय राऊत तपासाला सहकार्य करत नसून साक्षीदारांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याचं वकील हितेन वेणेगावकर यांनी कोर्टाला माहिती दिली. तसेच राऊतांना घरचे जेवण आणि औषध देण्यास हरकत नसल्याचं ईडीने कोर्टाला सांगितलं आहे. राजकीय द्वेषापोटी राऊत यांना अटक करण्यात आली असून कोठडीत असताना राऊत यांना वकीलांशी सल्लामतलज करण्याची परवानगी संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरगी यांनी मागितली आहे.
संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांच्याकडून संजय राऊत यांना दरमहा २ लाख रुपये दिले जायचे असा आरोप ईडीने केला आहे. तसेच संजय राऊत यांच्या परदेश दौऱ्यासाठीही प्रविण राऊत यांनी पैसा दिला होता असाही दावा ईडीने केला. २०१०-११च्या दरम्यान संजय राऊतांनी अनेक परदेश दौऱ्यांना फायनान्स करण्यात आले होते, असा आरोपही ईडीने केला.