महाराष्ट्र सदन घोटाळा: छगन भुजबळांना मोठा दिलासा! ईडीने घेतली याचिका मागे; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 11:33 PM2023-12-11T23:33:04+5:302023-12-11T23:35:34+5:30

Maharashtra Sadan Scam Chhagan Bhujbal News: सदर याचिका मागे घेण्यास परवानगी देण्याची ईडीची विनंती कोर्टाने मान्य केली.

ed withdraws plea against minister chhagan bhujbal and nephew sameer bhujbal but not his son pankaj bhujbal know the details | महाराष्ट्र सदन घोटाळा: छगन भुजबळांना मोठा दिलासा! ईडीने घेतली याचिका मागे; पण...

महाराष्ट्र सदन घोटाळा: छगन भुजबळांना मोठा दिलासा! ईडीने घेतली याचिका मागे; पण...

Maharashtra Sadan Scam Chhagan Bhujbal News: मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध केला आहे. सापडलेल्या कुणबी नोंदी रद्द कराव्यात. तसेच शिंदे समिती बरखास्त करावी, अशी मागणीही छगन भुजबळ यांनी केली. यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका करत, अगदी महाराष्ट्र सदन घोटाळ्याचाही उल्लेख केला. याचप्रकरणी छगन भुजबळ यांना दिलासा मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना ईडीने २०१६ मध्ये अटक केली होती. दोन वर्षांनी या प्रकरणी उच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांना जामीन मंजूर केला होता. तर, विशेष न्यायालयाने १६ ऑक्टोबर रोजी छगन भुजबळ यांना पारपत्र नूतनीकरणाची परवानगी देऊन परदेशात जाण्यची परवानगी दिली होती. या निर्णयाला ईडीने २०१८ मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेत असल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतेच उच्च न्यायालयात सांगितले.

याचिका नेमकी कशासाठी केली, हे स्पष्ट करण्यासाठी ईडीला वेळ 

हे प्रकरण सप्टेंबर महिन्यात सुनावणीसाठी आले. त्यावेळी याचिका नेमकी कशासाठी केली होती हे आठवत नसल्याचे आणि याचिकेची प्रत सापडत नसल्याचे ईडीच्या वतीने न्यायालयाला सांगितले होते. न्यायालयाने ईडीच्या या दाव्याबाबत आश्चर्य व्यक्त केले होते. याचिका नेमकी कशासाठी केली हे स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने ईडीला वेळ दिला होता. या प्रकरणी नुकतीच सुनावणी झाली. या सुनावणीत छगन भुजबळ आणि समीर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेण्यात येत असल्याचे ईडीच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. ही याचिका मागे घेण्यास परवानगी देण्याची मागणी केली. न्यायालयाने ईडीची मागणी मान्य केली. विशेष म्हणजे, छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्याविरोधातील याचिका मात्र ईडीने मागे घेतलेले नाही.

दरम्यान, काही रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील तीन आरोपींनी आता माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. मंत्री छगन भुजबळ या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. छगन भुजबळांसह इतरांनी या खटल्यातून मुक्त करावे, या मागणीसाठी दाखल केलेल्या दोषमुक्तीच्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे.  मात्र, ही सुनावणी थांबवून आमच्या माफीचा साक्षीदार होण्याच्या अर्जावर आधी निर्णय घ्यावा, अशी या तिघांनी कोर्टाला विनंती केली आहे. 
 

Web Title: ed withdraws plea against minister chhagan bhujbal and nephew sameer bhujbal but not his son pankaj bhujbal know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.