मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक नेत्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. यावरुन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ईडीवर निशाणा साधला आहे. सत्यजीत तांबे यांनी ट्विटवरून टीका केली आहे. ते म्हणाले, "ईडी झालीय ' येडी ' ! मालकाचं ऐकून काहीही करु लागलीय."
दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून एमआरए पोलीस ठाण्यात हायकोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांवर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता (ईडी) देखील तपासाचा फास आवळत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ईडीच्या या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दुसरीकडे, ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मला ईडीची कोणतीही नोटीस अद्याप मिळालेली नाही. आलीच तर मी चौकशीला सामोरे जाईन. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मी त्यांचे स्वागत करतो सांगितले. तसेच, राज्यातील कोणत्याही बँकेचा मी संचालक नव्हतो. कधीही मी संचालक पदासाठी निवडणूक लढवली नाही. ज्या संस्थेचा मी सभासद देखील नाही आणि संस्थेने घेतलेल्या निर्णयात माझा सहभाग नाही, अशा प्रकरणात माझे नाव आल्याचेही शरद पवार यांनी सांगितले आहे.