संघर्षाला सोशल मीडियाची धार

By admin | Published: October 22, 2016 03:15 AM2016-10-22T03:15:40+5:302016-10-22T03:15:40+5:30

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-भाजपाची स्वबळाची भाषा आणि एकमेकांची उणीदुणी काढणारी वक्तव्ये अलीकडे कमी झाल्याचे चित्र आहे. नेत्यांनी

The edge of social media to struggle | संघर्षाला सोशल मीडियाची धार

संघर्षाला सोशल मीडियाची धार

Next

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-भाजपाची स्वबळाची भाषा आणि एकमेकांची उणीदुणी काढणारी वक्तव्ये अलीकडे कमी झाल्याचे चित्र आहे. नेत्यांनी थेट आरोपबाजीला लगाम लावला असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना बोचकारे काढण्याचा प्रकार मात्र तेजीत सुरू आहे. त्यासाठी निनावी लिखाण, व्यंगचित्रांचा आधार घेतला जात आहे. मित्रपक्षाचे वाभाडे काढणारे हे साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, फेसबुक आणि बल्क ई-मेलचा आधार घेतला जात आहे.
महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपा नेत्यांची वक्तव्ये आणि आंदोलने यामुळे शिवसेना चांगलीच डिवचली गेली. त्यामुळे भाजपाच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेणारे मेसेज शिवसेनेच्या गोटातून फिरवण्यात आले. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून हे मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे विशेष प्रयत्न झाले. शिवसेनेच्या या निनावी हल्ल्यानंतर भाजपाकडून लागलीच प्रत्युत्तर आले. ‘एक भाजपा कार्यकर्ता’ या नावाने एक लेख अनेकांना ई-मेल करण्यात आला. टेंडर सेनेचा झिंग झिंगाट सुरू या मथळ्याखाली पालिकेतील शिवसेनेचा भ्रष्ट कारभार, सेनानेत्यांचे बिल्डरांशी असलेले साटेलोटे यावर थेट भाष्य करण्यात आले. माफियांच्या जाळ्यात अडकून गळ्याभोवती फास आवळला जात असल्यानेच कंत्राटी बोरुबहाद्दरांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप त्या मेलमध्ये करण्यात आला. महापालिकेतील माफिया राज उद्ध्वस्त करायचा चंग भाजपाने बांधला त्याचा एवढा राग यांना का आला? आपली सर्व दुकानदारी आणि पाकीटमारी बंद होणार म्हणून ही टेंडर सेना बिथरली आहे. स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वी मातोश्रीवर मंजुरीला जातात हे आता मुंबईकरांना कळून चुकले आहे. रावणाचा जीव बेंबीत होता असे म्हटले जाते तसाच माफियांचे समर्थन करणाऱ्यांचा जीव स्थायी समितीत आहे. पुढच्या पाच महिन्यांत ही स्थायी समिती आणि सत्ता हातातून जाणार याची चाहूल लागताच टेंडर सेनेने थयथयाट सुरू केल्याचा आरोप यात करण्यात आला.
ही पहिली चकमक काहीशी शांत होते न होते तेवढ्यात व्यंगचित्रांच्या माध्यमातून बोचकारे काढण्याचे काम आता सुरू झाले आहे. १४ फुटी झोपड्यांवरील कारवाईचा प्रश्न तापत असतानाच ‘करून दाखवले’ या मथळ्याखालील व्यंगचित्र व्हायरल करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. बकाल आणि उंच झोपड्या, भरलेला नाला याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र छापण्यात आले. काळा इतिहास रचून दाखविला, झोपडी माफिया आणि अनधिकृत झोपड्यांचे रक्षण यांनी केले असे सुचवत मुंबईकर करदात्यांना आवाहन करण्यात आले. त्यासाठी टॅक्सपेयर मुंबईकर या ई-मेल आयडीचा वापर करण्यात आला.

Web Title: The edge of social media to struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.