मुंबई : नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम हाती घेतली असून अलीकडेच मिठाई, नमकीन, खाद्यतेल आणि इतर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर छापे मारून ७६ नमुने विश्लेषणाकरिता घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एफडीए कडून देण्यात आली.
खाद्यतेल, मिरची पावडर आणि दूध यांच्या पिशव्यांवर कोणत्याही प्रकारचा लेबल आणि संबंधित मजकूर नसल्यामुळे त्यांचा साठा जप्त करण्यात आला. त्याचे वजन ७४८ किलो तर किंमत २ लाख ८४ हजार २४० रुपये आहे. तसेच रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल या खाद्यतेलाचा नमुना ही विश्लेषणासाठी घेण्यात आला. जप्त केलेले तेल ७४४ किलो असून त्याची किंमत १ लाख ११ हजार ६०० रुपये आहे.
दुधात भेसळ संदर्भात मालाड (पूर्व) येथे दोन छापे टाकण्यात आले. जप्त केलेल दूध २८५ लिटर असून त्याची किंमत १७ लाख २८ रुपये आहे. हे नमुने विश्लेषणाकरिता प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
तुटपुंजे मनुष्यबळ असतानाही ठाणे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेल, यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा राबविण्यात येणार आहेत.
- महेश चौधरी, सहआयुक्त (अन्न), बृहन्मुंबई विभाग
उत्पादकांची बैठक
अन्न व औषध प्रशासनाच्या बृहन्मुंबई कार्यालयामार्फत मिठाई, मावा उत्पादक व वितरक यांची सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली.
ग्राहकांना दर्जेदार आणि ताज्या मिठाईची विक्री करावी, अन्न विषबाधेसारखे प्रकार घडू नयेत म्हणून संबंधितांनी काय खबरदारी घ्यावी? याबाबतच्या सूचना व्यावसायिकांना देण्यात आल्या. ३० ते ३५ व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.