खाद्यतेलाचे भाव घसरले, तरी चढ्या दराने विक्री?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 02:30 PM2023-10-10T14:30:32+5:302023-10-10T14:31:36+5:30
...येत्या दिवाळीत तरी महागाईतून सुटका होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. याचे नेमके कारण काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. या बातमीने ग्राहकवर्गाला दिलासा मिळाला तरी प्रत्यक्षात मात्र रिटेल किंवा किराणा बाजारात तेलाची विक्री ही पूर्वीच्या चढ्या दरानेच होत आहे. त्यामुळे येत्या दिवाळीत तरी महागाईतून सुटका होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. याचे नेमके कारण काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला आहे.
म्हणून तेल महागच
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्या तरी डॉलरच्या विनिमय दरात वाढ झाल्यामुळे आयात खर्च वाढला आहे. सध्या बाजारात उपलब्ध तेल आम्ही पूर्वीच्या चढ्या भावाने विकत घेतले होते. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत किंमत कमी झाली तरी आयातदारांना किंमत कमी करता येत नाही.
- विनोदकुमार कांजी, तेल व्यापारी
किमती घसरण्याची शक्यता
- भारत प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून पामतेल खरेदी करतो, तर अर्जेंटिना, ब्राझील, रशिया आणि युक्रेनमधून सोयाबीन आणि सूर्यफूल तेल आयात करतो.
- भारत २०२२-२३ मध्ये ३.५ दशलक्ष विरूद्ध २०२३-२२ मध्ये ३.२ दशलक्ष मेट्रिक टन सोयाऑईल खरेदी करेल, असा अंदाज तेल व्यावसायिकांनी वर्तवला होता.
- सूर्यफूल तेलाची खरेदीही अपेक्षित होती. दरम्यान, २०२२ - २३ मध्ये १.२. ते १.५ दशलक्ष मेट्रिक टन सोयाबीन आणि १.२ ते १.४ दशलक्ष मेट्रिक टन राई तेलाचा साठा पुढील वर्षी खाद्य तेलाची आयात कमी करण्यास मदत करेल.
- बंदरांवर अजूनही अडकलेला आयात तेलसाठा स्थानिक पुरवठा वाढवेल. परिणामी पुढील वर्षीची आयात कमी होऊन तेलाच्या किमती घसरण्याची शक्यता आहे.
...तर दिवाळीत घटतील दर
कमी किमतीत बुक केलेली उत्पादने दिवाळीत बाजारात उपलब्ध झाल्यावर रिटेल बाजारात तेलाच्या किमती कमी होतील. राष्ट्रीय महसूल मंडळाच्या आकडेवारीनुसार गेल्या तीन महिन्यांत १.६५ लाख टन सोयाबीन आणि २.७० टन पामतेल देशात आयात करण्यात आले आहे. तसेच २०२१-२२ आर्थिक वर्षाच्या डिसेंबर - फेब्रुवारीमध्ये देशाने २.४५ लाख टन सोयाबीन आणि २.७७ लाख टन पामतेल आयात केले होते.
- मयुर सावला, तेल विक्रेता