मुंबई : सध्या सोशल मीडियावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयीच्या चर्चेला उधाण आले आहे. कोहिनूर गैरव्यवहार प्रकरणी राज ठाकरे यांची सक्तवसुली संचालनालयाने गुरुवारी चौकशी केली. याचे पडसाद सोशल मीडियावरून उमटले. या विषयावर अनेक युजर्सनी पोस्ट शेअर करून मत मांडले.सोशल मीडियाच्या माध्यमातून युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. सोशल मीडियावरून बलार्ड हाउसच्या बाहेरील सुरक्षेचा फोटो प्रचंड व्हायरल झाला. टिष्ट्वटरवरून #राजठाकरे, #मनसे, #ईडी, #आयसपोर्टराजठाकरे असे हॅशटॅग वापरून मेसेज व्हायरल केले जात होते. गजानन काळे मनसे या अकाउंटवरून ‘अंजलीताई दमानं घ्या, इतर नेत्यांच्या घोटाळ्यांबाबत बोलताना दिसल्या नाही,’ अशा आशयाची पोस्ट शेअर करण्यात आली होती. विठ्ठल या अकाउंटवरून सूड बुद्धीने सुरू असलेल्या कारवाईचा जाहीर निषेध, अशा आशयाची पोस्ट शेअर करण्यात आली.फेसबुकवरून ‘ईडा पिडा टळो’, अंजलीताई जरा ‘दमानी’ घ्या!, ‘कृष्णकुंजबाहेर लक्ष्मण रेषा आखली तर चौकशी टळू शकते का?’ अशा पोस्ट व्हायरल झाल्या. तर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ व्हिडीओ शेअर करण्यात आले. ‘राज ठाकरेंसोबत अख्खा महाराष्ट्र आहे,’ अशा आशयाची पोस्ट अनेक युजर्सनी स्टेट्सवर ठेवली होती.
सोशल मीडियावर ईडीचे ‘राज’कारण; सुरक्षेचा फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 12:13 AM