Join us

ईडीची नजर आता शिवसेनेवर; केंद्र विरुद्ध महाविकास आघाडी सरकार संघर्ष पेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 10:13 AM

संजय राऊत यांच्या पत्नीची गेल्या जानेवारीमध्ये ईडीने एका प्रकरणात चौकशी केली होती.

मुंबई :  एकाच दिवसांत कॅबिनेट मंत्री अनिल परब आणि खासदार भावना गवळी या शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर नेत्यांवरील ईडीच्या कारवाईमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या आधी खासदार संजय राऊत यांची पत्नी, आमदार प्रताप सरनाईक व त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे ईडीच्या रडारवर आले होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयीच्या वादग्रस्त विधानानंतर राणेंना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आठवडाभराच्या आतच अनिल परब आणि भावना गवळी ईडीच्या चौकशीच्या घेऱ्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली असून केंद्रात सत्तारुढ भाजप विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे आहेत.

संजय राऊत यांच्या पत्नीची गेल्या जानेवारीमध्ये ईडीने एका प्रकरणात चौकशी केली होती. प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित कार्यालयांवर ईडीने छापे टाकले होते आणि त्यांची चौकशीदेखील केली होती. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मुरुड येथील बंगल्याचे बांधकाम त्यांनी स्वत:च तोडले होते. भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी या बंगल्याचे बांधकाम सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून झाल्याचा आरोप केला होता.

सरनाईक हे मुख्यमंत्री ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्ती मानले जातात. त्यांच्यापेक्षाही अनिल परब सद्यस्थितीत ठाकरे यांचे अधिक निकटवर्ती मानले जातात. ईडीने त्यांच्यावर चौकशीची दिशा वळविल्याने येत्या काही दिवसात शिवसेना-भाजपमधील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :शिवसेनाअंमलबजावणी संचालनालय