धाडीचा दणका : ‘महादेव ॲप’वर ईडीचे लाॅगइन; अनेक बाॅलीवूड स्टार रडारवर, ४१७ काेटींची माया जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 08:05 AM2023-09-16T08:05:13+5:302023-09-16T08:06:28+5:30
Mahadev App: बॉलिवूडमधील स्टार्सशी संधान साधत ऑनलाइन सट्टेबाजी ॲपचे प्रमोशन करणाऱ्या महादेव ॲप कंपनीला शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जोरदार दणका देत मुंबई, कोलकाता, भोपाळ येथे ३९ ठिकाणी छापेमारी केली
मुंबई - बॉलिवूडमधील स्टार्सशी संधान साधत ऑनलाइन सट्टेबाजी ॲपचे प्रमोशन करणाऱ्या महादेव ॲप कंपनीला शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जोरदार दणका देत मुंबई, कोलकाता, भोपाळ येथे ३९ ठिकाणी छापेमारी केली आणि कंपनीची तब्बल ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.
तपासादरम्यान महादेव ॲप आणि बॉलिवूडचे कनेक्शनदेखील उजेडात आले असून, लवकरच काही प्रमुख बॉलिवूड अभिनेत्यांची देखील ईडी चौकशी करणार असल्याचे समजते. याप्रकरणी मुंबईतील आठ अंगडियांवरही छापेमारी करण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी ‘महादेव ॲप’ ही कंपनी दुबई येथून सुरू केली. त्याकरिता भारतामध्ये डीलर नेमले होते. ७० टक्के त्यांचा व ३० टक्के डीलरचा नफा या पद्धतीने व्यवहाराचा सौदा ठरला होता. या ॲपच्या माध्यमातून लोकांना विविध प्रकारचे ऑनलाइन खेळ, ऑनलाइन रमी, सट्टेबाजी आदी खेळता येत होते. याकरिता लोकांना त्या ॲपवर अकाऊंट उघडून त्यातील वॉलेटमध्ये पैसे जमा करून त्याद्वारे खेळण्याची सुविधा होती. या ॲपच्या मार्केटिंगसाठी कंपनीने देशभरात मोठा पैसा ओतला आणि लक्षावधी लोक त्याच्याशी जोडले गेले.
या लोकांनी खेळ खेळण्यासाठी जे पैसे या ॲपमध्ये भरले तेच पैसे सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी हवालाच्या माध्यमातून दुबईत फिरवले. तसेच हे पैसे दुबईत मोठ्या प्रमाणावर रोखीने खर्च केल्याचे तपासात दिसून आले. याप्रकरणी मुंबई, कोलकाता आणि भोपाळ येथे कंपनीचे डीलर मोठ्या प्रमाणात सक्रिय होते. त्यांच्या कार्यालयावरही छापेमारी करण्यात आली. या छाप्यांत आतापर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल ४१७ कोटी रुपये जप्त केले आहे. यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कमदेखील मिळाली आहे.
लग्नात खर्च केले २०० कोटी
या कंपनीचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याचे फेब्रुवारीमध्ये दुबईत आलिशान लग्न झाले. या लग्नासाठी तब्बल २०० कोटी रुपये रोखीने खर्च केल्याचे ईडीच्या तपासात आढळले. याकरिता भारतातून खासगी विमानांनी अनेक लोक दुबईत पोहोचले होते. या आलेल्या पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था ज्या हॉटेलमध्ये केली तेथे ४२ कोटी रुपयांचे बिल रोखीने देण्यात आले.
१८ सप्टेंबरला होणार होती पार्टी
हे ॲप यशस्वी झाल्याबद्दल १८ सप्टेंबर रोजी कंपनीतर्फे दुबईमध्ये शानदार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीसाठी बॉलिवूडमधील अनेक नामांकित अभिनेते व अभिनेत्रींना आमंत्रित केले होते. याकरिता त्यांना ४० कोटी रुपयांपर्यंत रक्कम दिल्याचाही ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.
बॉलीवूडचे स्टार ईडीच्या रडारवर
सौरभ चंद्राकर याच्या लग्नासाठी बॉलिवूडमधील काही प्रमुख स्टार्स उपस्थित राहिल्याचे समजते. तसेच त्यांनी त्या लग्न सोहळ्यात आपले कलाविष्कारदेखील सादर केले. यामध्ये गायिका नेहा कक्कर, आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल दादलानी, भारती सिंग, सनी लिऑन, भाग्यश्री, कीर्ती खरबंदा, नुसरत भरूचा, कृष्णा अभिषेक आदींचा समावेश असल्याचे समजते.
५,००० कोटींचा हवाला
आतापर्यंत याप्रकरणी तब्बल पाच हजार कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून दुबईला पाठविण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. याप्रकरणी सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे.