मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदी सरकारचा पर्दाफाश केला होता. तसेच विरोधी पक्षांना एकत्रित करून ईव्हीएम विरोधात जनआंदोलन छेडले आहे. मोदी, शाह यांच्या हुकुमशाही विरोधात ठाम पणे उभे राहिल्यामुळेच राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
राज ठाकरे यांना ईडीने पाठवलेली नोटीस ही मोदी, शाह यांनी सुडबुद्धीने केलेली कारवाई आहे. मोदी, शाह ही जोडी लोकशाहीला हरताळ फासून हुकुमशाही पद्धतीने देश चालवत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणाऱ्या प्रत्येकाच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय यांच्या चौकशा लावल्या जात आहेत असं थोरात यांनी म्हटलं आहे. तसेच वरिष्ठ काँग्रसे नेते पी. चिदंबरम यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना ही अशाच प्रकारे त्रास देण्यात येत आहे. देशभरातील विरोधी पक्षाचे जे नेते सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवतात त्यांना अशा प्रकारच्या नोटीसा देऊन त्रास दिला जात आहे. मोदी शाह, जोडी संविधानिक संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे, हे लोकशाहीसाठी घातक आहे. सरकार विरोधात बोलणाऱ्यांना ईडीच्या नोटीसा पाठवायच्या, देशद्रोही ठरवायचे हाच मोदी शाह यांचा न्यू इंडिया आहे, असंही थोरात म्हणाले आहेत.
ईडीच्या नोटिशीला घाबरत नाही; मोदींच्या हिटलरशाहीविरोधात लढा सुरूच राहील, मनसेचा इशारा
कोहिनूर मिल प्रकरणात मनसेप्रमुखराज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीविरोधात मनसेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारतातील हिटलर आहेत. राज ठाकरेंना बजावण्यात आलेली ईडीची नोटीस हा केवळ दबावतंत्राचा भाग आहे. गेल्या पाच सहा वर्षांत भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी झालेली नाही. मात्र अशा चौकशांना मनसे घाबरणार नाही, तर हिटलरशाहीविरोधातील लढा सुरूच राहील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.
लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर चौफेर टीका करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोहिनूर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठविली असून येत्या 22 ऑगस्टला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, या प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही सक्तवसुली संचालनालयाकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.