अमित भोसले यांच्यावर ईडीच्या चौकशीचा फेरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:07 AM2021-07-07T04:07:47+5:302021-07-07T04:07:47+5:30
बेकायदेशीर बांधकाम प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचे पुत्र अमित यांचा ...
बेकायदेशीर बांधकाम प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचे पुत्र अमित यांचा सक्तवसुली संचालनालयाकडील (ईडी) चौकशीचा फेरा कायम राहिला आहे. मंगळवारी अधिकाऱ्यांनी त्यांची चार तास चौकशी केली. त्यांना लवकरच पुन्हा पाचारण केले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मनी लाँड्रिंग व पुण्यातील एका बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात अमित यांच्याकडे ईडीने २ व ३ जुलैला तब्बल ९ तास चौकशी केली होती. ती पूर्ण न झाल्याने मंगळवारी पुन्हा पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार ते सकाळी अकराच्या सुमारास बेलार्ड पियार्ड येथे हजर झाले होते. सरकारी जागेवर उभारलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या अनुषंगाने सरकार व संबंधितांशी केलेला पत्रव्यवहार व आर्थिक व्यवहार तपासण्यात येत आहे. त्याबाबत सविस्तर जबाब नोंदविला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी अविनाश भोसले, अमित भोसले यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, हायकोर्टाने त्यामध्ये हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेत भोसले पिता-पुत्रांना चौकशीला सामोरे जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अविनाश भोसले यांना १ जुलै रोजी, तर अमित यांची त्यानंतर दोन दिवस चौकशी केली होती.
ईडीने १० दिवसांपूर्वी ‘फेमा’ कायद्यांतर्गत ४० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यांचे पुणे, नागपुरातील व गोव्यातील, हॉटेल व भूखंड जप्त करण्यात आले आहेत. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती.