महिलेचा विनयभंग करणाऱ्या ११ महिलांना शिक्षा
By admin | Published: December 31, 2015 01:15 AM2015-12-31T01:15:56+5:302015-12-31T01:15:56+5:30
शिवडी येथे भररस्त्यात एका तरुणीचे कपडे फाडून तिला नग्न केल्याबद्दल सत्र न्यायालयाने ११ महिला आणि एका पुरुषाला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप
मुंबई: शिवडी येथे भररस्त्यात एका तरुणीचे कपडे फाडून तिला नग्न केल्याबद्दल सत्र न्यायालयाने ११ महिला आणि एका पुरुषाला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप महिलांवर ठेवला जाऊ शकत नाही. कारण कायद्याच्या कलमात तशी तरतूद नाही, असा पवित्रा बचावपक्षाच्या वकिलांनी घेतला. मात्र सत्र न्यायालयाने हा बचाव फेटाळून लावला.१७ जून २०१० रोजी जमावाने पीडितेवर हल्ला केला. तिच्या भावाला चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यामुळे संतप्त जमावाने पीडितेवर हल्ला केला.
‘गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत निर्घृण आहे. आरोपी एकत्र जमले, त्यांनी मुलीला घराबाहेर मोकळ्या जागी ओढत नेले. तिची वस्त्रे फाडून तिला नग्न करण्यात आले. हे कृत्य तिचा अपमान करण्यासाठी आणि तिच्या कुटुंबियांना धडा शिकवण्यासाठी करण्यात आले. कोणीही असे कृत्य करून कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकले, असा संदेश समाजात जायला नको,’ असे सत्र न्यायालयाने निकाल देताना नमूद केले.
आरोपींनी पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचे स्पष्ट होत नाही, त्यामुळे त्यांच्यावर यासंबंधी नोंदवण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात येत आहे, असे न्यायालयाने म्हटले. ‘पीडिता ज्या ठिकाणी राहात आहे, तेथील बहुतांशी लोक अनुसूचित जमातीची आहेत आणि काही आरोपीही त्याच जमातीची आहेत,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
न्यायालय काय म्हणाले...
‘आयपीसीच्या कलम ८ मध्ये लिंगाविषयी स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. या कलमात वापरण्यात आलेला ‘तो’ हा शब्द सर्वनाम असून तो पुरुष किंवा महिलेला उल्लेखून आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आयपीसी कलम ३५४ महिलांसाठीही लागू होतो,’ असे न्यायालयाने म्हटले.