Join us

शिवरायांबाबतच्या चुकीच्या माहितीला शिक्षण विभाग जबाबदार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 2:37 AM

११वी संस्कृतच्या पुस्तकांमधील उल्लेख

मुंबई : अकरावी संस्कृतच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ यांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांची ‘पत्नी’ असा झाला आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून इतिहासाचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात येत असल्याचा आरोप संभाजी व जिजाऊ ब्रिगेडने केला आहे. मात्र याच्याशी मंडळाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आले.राज्याच्या संस्कृत विषयाच्या अकरावीच्या अभ्यासक्रमासाठी लातूरच्या निकिता पब्लिकेशनचे ‘संस्कृत सारिका’ हे पुस्तक आहे. राजेंद्र शास्त्री (गायकवाड) यांनी ते लिहिले असून यामध्ये जिजाऊंची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड केला आहे. हे पुस्तक रद्द करण्याची आणि शिक्षण विभागाची अभ्यास समिती व परवानगी देणारी समिती बरखास्त करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. खासगी प्रकाशनाच्या गाईडमध्ये काय लिहिले जाते, याला शिक्षण विभाग जबाबदार असत नाही. प्रकाशन संस्थेला कळवून हवे ते बदल करावे किंवा प्रकाशकाविरुद्ध तक्रार करावी, असे माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हटले आहे.

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजशिक्षण