शिक्षण विभागाला उमगेना विद्यार्थ्यांचा ‘कल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 05:57 AM2018-05-16T05:57:56+5:302018-05-16T05:57:56+5:30
राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे मोठा गाजावाजा करत, मागील २ वर्षांपासून घेण्यात येणारी कलचाचणी यंदाही घेण्यात आली.
सीमा महांगडे
मुंबई : राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे मोठा गाजावाजा करत, मागील २ वर्षांपासून घेण्यात येणारी कलचाचणी यंदाही घेण्यात आली. मात्र, यातून समोर आलेल्या निकालातून विद्यार्थ्यांचा कल आणि प्रत्यक्षात असलेली रुची यात कमालीचा फरक दिसून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कलचाचणीच्या निकालाचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशासाठी होणार नसल्याची टीका पालक व विद्यार्थ्यांसह तज्ज्ञांकडूनही करण्यात येत आहे.
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील प्रवेशाच्या गोंधळाचा तिढा दूर व्हावा, म्हणून शिक्षण विभागातर्फे बोर्डाच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्यात येते. वाणिज्य, ललित कला, कला, गणवेशधारी सेवा, कृषी, आरोग्य विज्ञान, तांत्रिक या सात क्षेत्रांतील विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना या चाचणीत प्रश्न विचारण्यात येतात. विद्यार्थ्यांचा कल कुठल्या विषयात आहे, हे जाणून त्याच्या करिअरची वाट सोपी करण्यासाठी ही कलचाचणी घेण्यात येते. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या निकालाचा कल एक आणि त्यांना ज्या क्षेत्रात भविष्य घडवायचे, ते करिअर वेगळे असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कलमापन चाचणीचा निकाल जाहीर केल्यानंतर, काही शाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालासह प्रसार माध्यमांशी संवाद साधण्यासाठी बोलावले होते. त्या वेळी विद्यार्थ्यांनी ही माहिती दिली.
संजय शर्मा नावाच्या एका विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिका इतक्या उत्तम रीतीने सोडवली होती की, त्याला सगळ्याच क्षेत्रात उत्तम म्हणजे ९९ % कल दाखवला गेला. मात्र, त्याला प्रत्यक्षात विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा असल्याचे त्याने स्पष्ट केले, तर आदित्य सुर्वे या विद्यार्थ्याचा कल सगळ्याच विषयात खूप कमी म्हणजे ५% दाखवला गेला. प्रत्यक्षात त्याला खेळात आवड असून, त्याला क्रिकेटमध्ये करिअर करायचे असल्याचे त्याने सांगितले. जे. जे. स्कूल आॅफ गर्ल्सच्या काही विद्यार्थिनींच्या बाबतीतही असाच प्रकार समोर आला. या विद्यार्थिनींपैकी एक असलेल्या श्रुती शिर्के या विद्यार्थिनीचा कल हा कलचाचणीत तंत्रशिक्षणाकडे दाखविला असला, तरी प्रत्यक्षात तिला कलेला प्रवेश घायचा असल्याची माहिती तिने दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रत्यक्षातील करिअरची आवड आणि त्यांचा आलेला कल, यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही संभ्रमात पडले आहेत.
>संभ्रम टाळण्यासाठी समुपदेशन
कलचाचणीतील कल अंतिम आहे, असे म्हणता येणार नाही. याबाबत विद्यार्थी किंवा पालकांच्या मनात काही संभ्रम असल्यास, ते शिक्षण विभाग जिल्हा पातळीवर सुरू करण्यात आलेल्या समुपदेशन केंद्रावर जाऊन समुपदेशन घेऊन, त्यानुसार क्षेत्र निवडीला प्राधान्य देऊ शकतात, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले.
>योग्य मूल्यमापन गरजेचे
शिक्षण मंडळाकडून घेतला जाणारा उपक्रम चांगला आहे. मात्र, तो अजून सर्वसमावेशक असायला हवा, तरच त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकेल. त्या कलचाचणीच्या निकालाचे योग्य मूल्यमापन तज्ज्ञांकडून व्हायला हवे, तरच त्या आधारावर विद्यार्थ्यांना आपल्या करिअरचा खरा कल ओळखण्यास मदत होऊ शकेल.
- सागर मुंदडा, मानसोपचार तज्ज्ञ.