मुंबई : महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण विभागाच्या शैक्षणिक व प्रशासकीय सोईसाठी राज्यस्तरावर आयुक्त (शिक्षण), शिक्षण संचालनालय व विभाग स्तरावर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची निर्मिती केलेली आहे. हे उपसंचालक कार्यालयही आता डिजिटल झाले असून, शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाच्या नवीन संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाची माहिती शाळा स्तर व सर्वसामान्यांना जलद गतीने पोहोचविण्याच्या दृष्टीने तसेच शैक्षणिक व प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीकोनातून या कार्यालयाच्या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयांना आता सगळी माहिती एका क्लिकवर एकाचवेळी उपलब्ध होणार आहेमहाराष्ट्र राज्यामध्ये आठ विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालये आहेत. त्यामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालय, मुंबई हे एक विभागीय कार्यालय आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालय, मुंबई या विभागीय कार्यालयांतर्गत दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई, पश्चिम मुंबई, ठाणे, रायगड व पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे साहजिकच येथील कार्यभारसिद्ध अधिक आहे. एकाच वेळी शालेय विभाग तसेच महाविद्यालयीन विभागांना उपसंचालक कार्यालयाच्या सूचना पाठविणे आणि त्यांना त्या वेळेवर प्राप्त होणे सोयीचे व्हावे यासाठी या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. याआधीही उपसंचालक कार्यालयाचे संकेतस्थळ होते; मात्र आत्ताचे संकेतस्थळ आधुनिक स्वरूपातील आणि सहज हाताळता येईल असे आहे, अशी माहिती उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.dydemumbai.com या नवीन संकेतस्थळाची प्रामुख्याने, मुखपृष्ठ, परिपत्रके, सर्व शिक्षा अभियान, संपर्क, लेखा शाखा, आस्थापना अशा भागांत विभागणी केली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत राबविल्या जाणाºया सर्व उपक्रमांच्या माहितीसोबत या उपक्रमाबाबतीत झालेल्या महत्त्वाच्या पत्रव्यवहाराच्या प्रती पीडीएफ फॉरमॅटमध्ये उपलब्ध होणार आहेत. तसेच ‘महत्त्वाची संकेतस्थळे’ या शीर्षकाखाली या विषयासंदर्भातील महत्त्वाच्या संकेतस्थळांची लिंक देण्यात आलेली आहे. ‘परिपत्रके’ या भागात शासनाने शिक्षण विभागासाठी वेळोवेळी पारित केलेली विविध परिपत्रके पीडीएफ फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक परिपत्रके एकाच ठिकाणी मिळू शकतील.
शिक्षण उपसंचालक कार्यालय आता एका क्लिकवर, नवीन संकेतस्थळाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:40 AM