ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - मुंबई विद्यापीठातील भोंगळ कारभारावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कुलगुरु आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कुलगुरूंना विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवता येत नसतील तर त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई विद्यापीठातील गोंधळाबाबत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचीही भेट घेतली आहे. कुलगुरु आणि शिक्षणमंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागत आहे, याला कुलगुरु संजय देशमुख आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे जबाबदार आहेत, त्यामुळे त्या दोघांचे राजीनामे घ्यावे अशी मागणी आदित्य ठाकरेंनी राज्यपालांकडे केली.
यावेळी त्यांनी राज्यपालांसमोर विद्यापीठातील तक्रारींचा पाढा वाचला. तयारी नसताना ऑनलाईन पेपर तपासणीचा पर्याय का अवलंबण्यात आला? या सगळ्याची निविदा प्रक्रिया कशाप्रकारे पार पडली होती? निकाल न लागल्यामुळे विद्यार्थी अडचणीत आले आहेत. ऑनलाईन असेसमेंटसाठी 4 दिवस विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णयही दुर्दैवी असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. या चार दिवसांत महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे कोणतेही काम होणार नाहीये. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर कुलपती सी. विद्यासागर राव यांनी विद्यापीठाला 31 जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करावेत, अशी तंबी दिली होती. हा सगळा गोंधळ पाहता यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय उत्त्पन्न होत आहे. आतापर्यंत काही लाख उत्तरपत्रिकाच तपासून झाल्या आहेत. उर्वरित उत्तरपत्रिका 31 तारखेपर्यंत तपासून होणे शक्य आहे का? उत्तरपत्रिका तपासून झाल्याच तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणे शक्य आहे का? निकाल न लागल्यामुळे विद्यार्थी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर इतर विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर टाकावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
या प्रकाराला कुलगुरु संजय देशमुख आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे जबाबदार आहेत, त्यामुळे त्या दोघांचे राजीनामे घ्यावे अशी मागणी आदित्य ठाकरेंनी राज्यपालांकडे केली आहे.