मुंबई - शाळेतील शिक्षकांच्या आज्ञेनुसार आपल्या वडिलांवर निबंध लिहिणाऱ्या चौथीतील चिमुकल्याने सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभारले. सोशल मीडियावर या शाळकरी मुलाचा, वहीवर लिहिलेला निबंध मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. वाचणाऱ्याच्या काळजाचं पाणी करणाऱ्या या निबंधामुळे भीषण परिस्थितीचं वास्तव जगासमोर आलं. या चिमुकल्याच्या वेदना जाणून त्याला मदतीचा हात देण्याचं काम राज्यमंत्रीबच्चू कडू यांनी केलंय.
मंगेश व त्याच्या कुटुंबीयांनी आज विधानभवन येथे शालेय शिक्षणमंत्रीबच्चू कडू यांनी भेट घेतली. मंगेशच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च आम्ही करणार, असल्याचं कडू यांनी सांगितलं. तसेच, एकटा मंगेशच हे हाल सोसत नसून महाराष्ट्रात असे अनेक मंगेश आहेत, असेही ते म्हणाले. त्यामुळे, महाराष्ट्र शासनातर्फे, जी मुलं आई वडिलांशिवाय आहेत. तसेच ज्यांचे पालक अपंग आहेत. अशा अनाथ मुलांकरीता लवकरच 3000 रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती मिळण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे बच्चू कडूंनी सांगितले.
मंगेशच्या या व्हायरल निबंधाची सत्यता तपासून खुद्द सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही मंगेशच्या वेदना जाणून घेतल्या होत्या. महाराष्ट्राचे मंत्री असलेले धनंजय मुंडे हे बीड जिल्हावासियांचे आणि निकटवर्तीयांचे धनुभाऊच आहेत. त्यामुळेच, धनंजय मुंडेंनी पालक बनून बीड जिल्ह्यातील मंगेशच्या निबंधाची दखल घेत, त्याच्या कुटुंबीयास मदतीचा हात दिला.
"माझे नाव मंगेश परमेश्वर वाळके. माझ्या पप्पांचे नाव परमेश्वर वाळके असे होते. माझ्या पप्पाला टीबी हा आजार झाला होता. म्हणून माझ्या मम्मीनं मला मामाच्या गावाला पाठवलं होतं. माझे पप्पा वारले. माझे पप्पा गवंडीच्या हाताखाली काम करायचे. मला खाऊ आणायचे. वही, पेन आणायचे. माझा लाड करत होते. मला माझे पप्पा लई आवडत होते. माझे पप्पा वारले. माझी मम्मी खूप रडली. मी बी लई रडलो..... अशा आशयाने सुरुवात असलेल्या या निबंधाची दखल धनंजय मुंडेंनी घेतली होती. त्यानंतर, बच्चू कडूंही मंगेशच्या पाठिशी उभे राहिले आहेत.
धनंजय मुंडेंनी दखल घेत, मंगेशच्या कुटुंबीयांना सामाजिक न्याय विभागाकडून दीड लाखांचे अर्थसहाय्य मिळवून दिले आहे. तसेच, दिव्यांग कल्याण निधीतून इतरही मदत उपलब्ध करुन देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मंगेशच्या वडिलांचे छत्र हरवले असून मंगेशची आई दिव्यांग आहे. अशा परिस्थितीही मंगेशची शिक्षणातील गोडी निबंधातून दिसून आली. त्यामुळेच, मंगेशबद्दल अनेकांनी हळहळ आणि संवेदना व्यक्त केल्या.