Join us

'ठुमकत नाचणारा मोर अन् वन्समोअर'; मराठी कवितेवर मंत्री केसरकर म्हणाले, "मला जास्त अनुभव पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 7:50 AM

बालभारतीने प्रकाशित केलेल्या मराठीच्या पहिल्याच्या पुस्तकातील कवितेवरुन वाद रंगलेला असताना मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Bal Bharti Marati Poem : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारतीच्या एका पुस्तकाची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरु आहे. बालभारतीने प्रकाशित केलेल्या पहिलीच्या पुस्तकातील एका कवितेवरुन वाद रंगला आहे. इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात चक्क इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषा शिकवताना कवितेत मराठी शब्द का वापरत नाही, असा सवाल विचारला जात आहे. आता या सगळ्या प्रकारावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. समितीला एकदा विचार करायला सांगतो असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

ठुमकत नाचत आला मोर, वन्समोअर, वन्समोअर झाला शोर! पहिलीच्या मराठीच्या एका कवितेच्या ओळीत हे  शब्द आल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. जंगलात ठरली मैफल नावाची ही कविता पूर्वी भावे यांची आहे. मात्र कवितेमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर केल्यामुळे त्यांच्यावर आणि बालभारतीवर प्रचंड टीका होतेय. किमान मराठी भाषा शिकवताना मराठी शब्द वापरायला हवेत असं वाटत नाही का? असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला. 

शाळांमध्ये एकीकडे मराठीचे शिक्षण सक्तीचे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असताना दुसरीकडे बालभारतीकडून मराठीचेच वाभाडे काढले जात असल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. महत्त्वाचे बाब म्हणजे या कवितेत मराठीऐवजी हिंदी शब्दांचाही वापर करण्यात आला आहे. कवितेवरील लोकांच्या संतापावरुन बालभारतीने अजब स्पष्टीकरण दिलं. पहिलीच्या पुस्तकामध्ये ही कविता २०१७ पासूनच होती. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या कवितेची कोणीच तक्रार केली नव्हती अशी माहिती बालभारतीनेच दिली.

समितीला एकदा विचार करायला सांगतो - दीपक केसरकर

दुसरीकडे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही याबाबत भाष्य केलं. "वन्समोअरला पर्यायी शब्द नाही. एखादा शब्द यमक जुळवण्यासाठी इंग्रजीतून येऊ शकतो. त्यामुळे त्याचा फार मोठा बाऊ करण्याची गरज नाही. काही शब्द रुढ झाले आहेत. आपण टेबलला टेबलच म्हणतो, कपबशीला कपबशीच बोलतो. मी मराठी भाषेचा मंत्री आहे. मराठी भाषेचे धोरण मीच आणलं त्यामुळे मला मराठीचा सगळ्यात जास्त अनुभव असणार. यामध्ये त्यामधील तज्ज्ञ व्यक्ती काम करत असतात. त्या कामामध्ये माझा काहीही हस्तक्षेप नसतो. तरी मी समितीला एकदा विचार करायला सांगतो. मात्र समितीत देखील साहित्यिक असतातच," असं दीपक केसरकर म्हणाले. 

टॅग्स :दीपक केसरकर मराठीशिक्षण