Join us

...तर आत्मचिंतन करा; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा नाव न घेता आशिष शेलारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 6:10 PM

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र काही लोकांना हा निर्णय पटत नाही असं उदय सामंत म्हणाले.

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणत्याही विद्यार्थ्याला कोरोनाची लागण होऊ नये यासाठी शालेय, महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याची भूमिका शासनाने घेतली मात्र या निर्णयावर माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी टीका करत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती.

याबाबत आशिष शेलार म्हणाले होते की, शिक्षणमंत्री मी रत्नागिरीत आहे, दोन दिवसांनी मंत्रालयात येतो मग एटीकेटी असलेल्या ३ लाख ४१ हजार ३०८ विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत निर्णय घेतो, आपण रत्नागिरीवरुन एसटी येण्याची वाट पाहत बसायचं का? राज्यातील ४० टक्के विद्यार्थ्यांना नापास करण्याचा घाट सरकार घालतंय, विद्यार्थ्यांच्या तणावाला सरकार जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला होता.

त्यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणाले की, अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र काही लोकांना हा निर्णय पटत नाही. मी दापोलीत आहे असं मी सांगितलं होतं, मी मुंबईला २ दिवसांनी आल्यावर यावर चर्चा करण्यात येईल असं सांगितले त्यावर विरोधी आमदारांनी टीका केली. बाकीच्या राज्यांनी काय काय निर्णय घेतले त्याचा अभ्यास करावा. आयआयटी जी संसदेच्या कायद्याप्रमाणे चालते. त्यांनीही अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या बाहेरील अनेक विद्यापीठांनी या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, ओडिसा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, गुजरात यासारख्या अनेक राज्यांनी अशाप्रकारे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला पण महाराष्ट्रात काही लोकांना पोटसूळ उठलं आहे अशी टीका त्यांनी नाव न घेतला भाजपा आमदार आशिष शेलार यांच्यावर केली.

तसेच अंतिम वर्षाच्या मुलांचे नुकसान होईल असा गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये पसरवला जात आहे. हेच लोक गोवा, मध्य प्रदेशामध्ये परीक्षा रद्द करण्याची भूमिका मांडतात. सर्वांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे तो विचारपूर्वक केला आहे. पदवी मिळाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

त्याचसोबत मी मुंबईत आल्यानंतर याबाबत बोलेन असं सांगितलं कारण कुलपती, कुलगुरू, मुख्यमंत्री मुंबईत आहेत म्हणून बोललो त्यावर टीका करण्यात आली. मी जो निर्णय घेतला आहे त्यावर ठाम आहे. विद्यार्थी आणि पालकांचा विचार करुन जे अपेक्षित आहेत तशाच निर्णय घेतला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत जो संभ्रम वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये असं आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.

टॅग्स :उदय सामंतआशीष शेलारशिक्षणविद्यार्थीपरीक्षा