विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत परीक्षेबाबत निर्णय घेणार - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:06 AM2021-05-24T04:06:14+5:302021-05-24T04:06:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष परीक्षा न घेता अन्य पर्यायांचा विचार करायला हवा, अशी भूमिका राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मांडली, तसेच दहावीच्या परीक्षांबाबात एक- दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांबाबत रविवारी केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक झाली. केंद्रीय मंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, प्रकाश जावडेकर यांच्यासोबतच राज्यांचे शिक्षणमंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. मंत्री वर्षा गायकवाड यांनी या बैठकीत महाराष्ट्राची भूमिका मांडली. जर सीबीएसईची परीक्षा पुढील महिन्यात घ्यायची असेल, तर पुढील महिन्यातील कोरोना परस्थिती पाहूनच राज्यांना परीक्षेबाबत विचार करावा लागेल. शिवाय, दीड वर्षापासून बारावीचे विद्यार्थी अभ्यास करत असून, त्यांची मानसिकता विचारात घेऊन निर्णय घ्यावा लागेल. परीक्षेबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आहे. कोविड महामारीच्या काळात पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेश परीक्षेद्वारेच प्रवेश दिला जातो. त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षेपेक्षा मूल्यांकनाची अन्य पद्धत वापरता येईल, अशी भूमिका तज्ज्ञ मांडत आहेत, असे वर्षा गायकवाड यांनी या बैठकीत स्पष्ट केले. सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांसह संबंधित कर्मचारीवर्गाच्या लसीकरणाची आवश्यकताही गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून सीबीएससी, तसेच राज्य मंडळाच्या परीक्षेचा निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री गायकवाड यांनी बैठकीत स्पष्ट केले, तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत आम्ही उच्च न्यायालयासमोर आमची भूमिका मांडणार आहोत. तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक आहे. दहावीच्या मुलांचे नुकसान होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत. असाधारण परिस्थितीत न्यायालयसुद्धा या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल, अशी भावनाही वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. आठवडाभरात सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.