मुंबई : लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू असतानाही शाळांनी शिकवणी शुल्कासह विविध प्रकारचे शुल्क पालकांकडून वसूल केले. लॉकडाऊन काळात नाेकऱ्या गेल्याने शुल्कात सवलतीची मागणी पालकांनी केली; मात्र याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आराेप करून संतप्त पालक ३० जानेवारीला सकाळी ११ वाजता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरावर आणि शिवसेना भवनावर मोर्चा काढणार आहेत.
लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने शुल्क घेऊ नये, आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले; मात्र ऑनलाइन शिक्षण सुरू असूनही अनेक शाळांकडून संपूर्ण शुल्क वसूल करण्यात येत होते. शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात तसेच परीक्षेलाही बसू दिले नाही. शुल्कासंदर्भातील प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगत शिक्षण विभाग, मुख्यमंत्र्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळेच याविराेधात माेर्चा काढणार असल्याची माहिती इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनच्या अध्यक्ष अनुभा सहाय यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष संपायला २ ते ३ महिने उरले असताना अनेक शाळा संपूर्ण वर्षाच्या शुल्क मागत असल्याने पालक संघटनांनी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार केली. शुल्कवाढ केलेल्या शाळांची यादी शालेय शिक्षण विभागाला दिली. तरीही सरकारने कार्यवाही केली नसल्याचे सहाय यांनी सांंगितले.