मुंबई : पालिका शाळांमध्ये मागील साडेतीन ते ४ वर्षांपासून सीसीटीव्ही न लावल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत हयगय झाली आहे. या पार्श्वभूमीवर याची जबाबदारी निश्चिती करत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
सोबतच ठाणे जिल्हयाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांना १६ ऑगस्ट रोजीच घटनेची माहिती असताना त्यांनी शिक्षण विभागाला माहिती दिली नाही आणि अनभिज्ञ ठेवले. या प्रकरणी त्यांना ही शिक्षणमंत्र्यांनी निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान बदलापूर घटनेची चौकशीचा अहवाल शिक्षण विभागाकडे आला असून त्यातील दोषींवर सहआरोपी ठरवण्यात येईल असे स्पष्ट केले.
निष्काळजीपणाच्या ठपक्यामुळे निर्णयपालिका शाळांतील सीसीटीव्हीचा मुद्दा प्रलंबित आहे. आधीच्या सीसीटीव्ही निविदा रद्द केल्यानंतर सीसीटीव्हीसाठी पुनः प्रस्ताव तयार करण्यात आला आणि निविदा काढण्यात आल्या. आठवडा भरापूर्वी या निविदांना मंजुरी देण्यात आली असल्याने वर्क ऑर्डर देण्यात आली. मात्र अनेक वर्षांपासून प्रश्न रेंगाळल्याने निष्काळजीपणाचा ठपका ठेवत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा निर्णय जाहीर केला. पालिका प्रशासनाकडून पुढचं एका महिन्यात पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही लागतील अशी हमी शिक्षणमंत्र्यांना देण्यात आली आहे.