मुंबई : निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतन वाढीस अखेर मान्यता मिळाली. त्यांना पाच हजारांची वाढ मिळाली आहे. हा प्रस्ताव आता वित्त विभागाकडे सादर झाला असून, लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.थकीत विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टरांनी फळे विकून आंदोलन केले. काही डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून काम केले. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठकाही झाल्या होत्या. निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या केंद्रीय मार्डचे अध्यक्ष डॉ. लोकेश चिरवटकर यांनी सांगितले की, विद्यावेतनासंबंधी ही वाढ कागदोपत्री आॅगस्ट २०१८ मध्ये घोषित करण्यात आली होती, परंतु त्यावर हालचाल झाली नाही, त्यामुळे पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उगारले. आता या वाढीला मान्यता मिळाली असून, दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण होईल. वित्त विभागाने डॉक्टरांना विद्यावेतन देण्यास १०० कोटी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला दिले आहेत.सातव्या वेतन आयोगाचा प्रस्तावही वित्त विभागाकडे पाठविला आहे. प्रसूती रजा, क्षयरोग रजांसंदर्भातही शासन निर्णय लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन पाच हजार रुपयांनी वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 5:43 AM