भरतीबंदीचा विरोध : प्राध्यापकांचा काम बंद आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 05:10 AM2018-09-23T05:10:08+5:302018-09-23T05:10:24+5:30
राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील भरतीबंदीमुळे सुमारे ११ हजार प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत आहे.
मुंबई - राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील भरतीबंदीमुळे सुमारे ११ हजार प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे रिक्त जागांवर प्राध्यापकांची कायमस्वरूपी भरती व्हावी, यासह विविध मागण्यांसाठी एम्फुक्टोने २५ सप्टेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
उच्च शिक्षण विभागाच्या वार्षिक सर्वेक्षणानुसार शैक्षणिक वर्ष २०१५-१६ आणि २०१६-१७ मध्ये राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३० लाखांवर पोहोचली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारशींप्रमाणे आवश्यक असलेले प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे गुणोत्तर प्रमाण १:२० असणे गरजेचे आहे. मात्र, राज्यात याउलट स्थिती आहे. त्याचा परिणाम उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे प्राध्यापकांची रिक्त पदे कायमस्वरूपी भरावीत, यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाद्वारे लढा उभारण्याचा ठराव महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अॅण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन (एम्फुक्टो)च्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण परिषदेच्या सभेत मुंबईत घेण्यात आला होता. त्यानुसार संघटनेतर्फे महिनाभरात आतापर्यंत सहा आंदोलने करण्यात आली. यामध्ये काळ्या फिती लावून निषेध आंदोलन, निदर्शने, धरणे, जेल भरो आंदोलनांचा समावेश आहे. त्यानंतरही मागणी मान्य न झाल्याने आता २५ सप्टेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल.
या आहेत मागण्या
शिक्षक भरतीवरील बंदी उठवावी, विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयातील वेतनव्यवस्था नियमित करावी, शिक्षक समस्या निवारण यंत्रणा निर्माण करावी, बेकायदेशीर कपात केलेले ७१ दिवसांचे वेतन अदा करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.