अफगाणिस्तानमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहणार; आयआयटी मुंबईकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये येण्यास परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 03:33 PM2021-08-16T15:33:48+5:302021-08-16T15:34:11+5:30
सध्यस्थीतीत आयआयटी मुंबईत अफगाणिस्तान येथील 11 विद्यार्थी शिक्षण घेत असून 2 विद्यार्थी आयआयटी संकुलात आहेत.
मुंबई- सध्यस्थीतीत अफगाणिस्तान येथील परिस्थिती भयावह असून आयआयटी मुंबई येथे शिकणाऱ्या अफगाणिस्तानमधील विद्यार्थ्यांनी आयआयटी संकुलात येऊन राहण्याची परवानगी संचालकांकडे मागितली होती. या मागणीला संचालक सुभाशिष चौधरी यांनी परवानगी दिली असून ते विद्यार्थी हवे तेव्हा शैक्षणिक संस्थेत येऊ शकणार आहे. सध्याच्या परिस्थितीत जरी हे विद्यार्थी भारतात, शैक्षणिक संस्थेत पोहचू शकले नाहीत तरी जेव्हा कधी ते इथे येतील त्यांना त्यांचा अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची परवानगी मिळेल अशी माहिती चौधरी यांनी दिली.
सध्यस्थीतीत आयआयटी मुंबईत अफगाणिस्तान येथील 11 विद्यार्थी शिक्षण घेत असून 2 विद्यार्थी आयआयटी संकुलात आहेत. मात्र 9 विद्यार्थी अद्यापही अफगाणिस्तान येथे असून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. आयआयटी मुंबईत शिकण्याची स्पर्धा मोठी असून प्रत्येक विद्यार्थ्याला ती संधी मिळत नसल्याने आणि अफगाणिस्तान सारख्या देशातून या विद्यार्थ्यांची येथील शिक्षणासाठी निवड झाली असल्याने त्यांची शिक्षणाची संधी अबाधित रहावी यासाठी आयआयटी मुंबईकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे संचालक सुभाशिष चौधरी यांनी सांगितले.