Join us  

Education: पदवी निकालाची गति‘विधि’ ठप्पच, विधि पदविकेचे विद्यार्थी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 9:39 AM

Education: कोविडकाळात विधि महाविद्यालयात या कोर्ससाठी प्रवेश घेतलेल्या आणि जूनमध्ये परीक्षा झालेल्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा निकाल ४ महिने उलटूनही विद्यार्थ्यांच्या हाती पडलेला नाही.

मुंबई : पदवी घेतलेले अनेक विद्यार्थी पुढील भविष्यातील संधीसाठी विधि अभ्यासक्रमाचा एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करतात. मात्र, कोविडकाळात विधि महाविद्यालयात या कोर्ससाठी प्रवेश घेतलेल्या आणि जूनमध्ये परीक्षा झालेल्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा निकाल ४ महिने उलटूनही विद्यार्थ्यांच्या हाती पडलेला नाही. महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता, महाविद्यालय प्रशासन विद्यापीठाकडे बोट दाखवत असून निकाल घोषित करण्याचे अधिकार प्रशासनाकडे असल्याचे सांगत आहेत. 

विद्यापीठ कायद्याच्या नियमानुसार, कोणत्याही परीक्षेचा निकाल हा महाविद्यालय आणि विद्यापीठाने ४५ दिवसांत देणे बंधनकारक आहे. मात्र, डिप्लोमा इन लेबर लॉ अँड इन लेबर वेल्फेअर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ आणि सिद्धार्थ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना ४ महिन्यानंतरही निकाल हाती मिळालेला नाही. 

विद्यार्थ्यांचे निकाल तयार असूनही केवळ विद्यापीठाकडून दिरंगाई होत असल्याने निकाल घोषित केले जात नसल्याची माहिती महाविद्यालयांनी दिल्याचे ते स्पष्ट करीत आहेत. दरम्यान, विद्यापीठ प्रशासन या विद्यार्थ्यांना त्यांचे नुकसान होत असलेल्या महिन्याचा पगार देणार का ? असा प्रश्न बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे सचिन पवार यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने निकालावर कार्यवाही करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे. 

विद्यापीठाचे स्पष्टीकरण या अभ्यासक्रमाच्या निकालात विद्यापीठाने दुरुस्ती सुचविली आहे.  निकाल दुरुस्तीसाठी महाविद्यालयात प्रलंबित आहे. दुरुस्ती महाविद्यालयाने केल्यानंतर अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर केला जाईल.

टॅग्स :मुंबई विद्यापीठशिक्षण