Join us  

शिक्षकानेच घेतले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:10 AM

सीमा महांगडेमुंबई : कोरोना काळात अनेक विद्यार्थ्यांचे पालकत्व हरवले आहे. एकल पालक मोलमजुरी करून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करीत ...

सीमा महांगडे

मुंबई : कोरोना काळात अनेक विद्यार्थ्यांचे पालकत्व हरवले आहे. एकल पालक मोलमजुरी करून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर बहुतांश ठिकाणी अशा परिस्थितीत अनेक विद्यार्थी शिक्षणाचा खर्च न परवडल्याने शाळाबाह्य होत आहेत. आर्थिक परिस्थिती नसल्याने अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण सुटून ती शाळाबाह्य होऊ नयेत यासाठी व्यवसायाने शिक्षक असलेल्या दत्तात्रय सावंत यांनी १० एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.

मुंबईसारख्या शहरात जिथे एका विद्यार्थ्याचे शिक्षण पालकांना परवडत नाही तिथे सावंत यांनी आपल्या शिक्षकी व्यवसायातून, शिवाय एकापेक्षा अधिक ठिकाणी शिकविण्या घेऊन आणि रिक्षा चालवून या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. दत्तात्रय सावंत मागील १५ वर्षांपासून घाटकोपरच्या ज्ञानसागर विद्यामंदिर या अंशतः अनुदानित शाळेमध्ये इंग्रजी हा विषय माध्यमिक विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत.

अंशतः अनुदानित शाळा असल्यामुळे मागील ३ वर्षांपासून त्यांना पोटापुरते वेतन मिळण्याची व्यवस्था होत आहे. त्यामुळे घर चालविण्यासाठी ते या आधीही पार्ट टाइम नोकरी म्हणून रिक्षा चालवतात. कोविड काळात एकीकडे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देऊन त्यांची चांगल्या समाजासाठी जडणघडण करायची आणि दुसरीकडे समाजसेवेचे व्रत म्हणून सध्याच्या कठीण परिस्थितीत गरीब, गरजू कोविड रुग्णांना रुग्णालयात, कोविड केंद्रात पोहोचविण्याची दुहेरी जबाबदारी पेशाने शिक्षक असलेले दत्तात्रय सावंत यांनी पार पाडली. याचाच पुढचा भाग म्हणून आता एकल पालक असलेल्या १० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी यांनी घेतली आहे. सध्या ते २ ठिकाणी शिकविण्या घेतात आणि रिक्षा चालवितात. या मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यकता असल्यास आणखी काही ठिकाणी काम करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.

कोविड काळातील परिस्थितीनंतर विद्यर्थ्यांचे शिक्षण सुटू नये यासाठी सावंत यांचा हा प्रयत्न आहे. आपल्याच परिसरातील आजूबाजूच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे. यामुळे हे १० विद्यार्थीही आपले शिक्षण अर्ध्यावर सुटणार नाही या भावनेनेच आनंदित झाले आहेत. या विद्यार्थ्यांपैकी ८० टक्के विद्यार्थ्यांनी वडिलांचे छत्र गमावले आहे. या विद्यार्थ्यांच्या आईंनी सावंत यांचे आभार कसे मानायचे, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

कोट

आर्थिक परिस्थितीमुळे शाळाबाह्य ठरणारी अनेक मुले सध्या आजूबाजूला आहेत. त्यांच्यातील काही मुलांच्या शिक्षणात जरी माझ्या कामामुळे हातभार लागला आणि त्यांचे भविष्य सुधारले, तर नक्कीच याहून दुसरा आनंद नाही.

दत्तात्रय सावंत, शिक्षक