Join us  

कोकणातील शिक्षण संस्था बंद पडण्याच्या मार्गावर: रमेश कीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2024 10:02 PM

नव्या शैक्षणिक धोरणांचा फटका

श्रीकांत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : केंद्र सरकारने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लादण्याचा डाव आखला आहे. त्याचा फटका कोकणातील शिक्षण संस्थांना अधिक बसत आहे. त्यामुळे कोकणातील खेड्यापाड्यांतील शिक्षण संस्था बंद पडतील व विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील, अशी भीती कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांनी येथे व्यक्त केली.

मुंबई मराठी पत्रकारसंघात कीर यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या बारा वर्षांत कोकण पदवीधर मतदारसंघाच्या आमदाराने पदवीधरांसाठी ठोस काहीही केले नाही. ते फक्त आमदार म्हणून मिरवत आहेत, अशा शब्दांत रमेश कीर यांनी निरंजन डावखरे यांच्यावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, सरकारच्या धोरणामुळे शैक्षणिकदृष्ट्या ग्रामीण भागात काम करणे कठीण झाले आहे. महाराष्ट्र शासन फक्त जनतेला आश्वासने देत आहे. राज्यात ८० टक्के पदवीधर तरुण बेरोजगार आहेत. कोकणातील पदवीधर आमदार हे पदवीधर, शिक्षण, बेरोजगारांकडे लक्ष देत नाहीत. कोकणात पदवीधर मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. रोजगारासाठी अन्य जिल्ह्यात जावे लागत आहे. त्यामुळे शासकीय पातळीवरील भरतीत येथील बेरोजगार तरुणांसाठी वेगळा निकष असणे आवश्यक आहे. येणाऱ्या उद्योग व्यवसायांमध्ये स्थानिकांच्या समावेशासाठी वेगळी भूमिका हवी.

जुन्या पेन्शनसाठी आग्रही

जुन्या पेन्शनसाठीही आपण आग्रही राहणार आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आग्रही मागणी व पाठपुरावा, शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य, शैक्षणिक धोरणांबाबत जागरूक राहू. पदवीधरांचा आवाज बनून, रिक्त पदे भरण्यासंदर्भात पाठपुरावा करणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हानिहाय प्रयत्नशील राहीन, जिल्ह्यात रोजगार मेळावे आयोजित करू, असेही कीर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :विधान परिषद निवडणूक 2024