शैक्षणिक साहित्य वेळेत मिळणार

By admin | Published: May 23, 2015 10:49 PM2015-05-23T22:49:45+5:302015-05-23T22:49:45+5:30

मागील तीन ते चार वर्षे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरु होऊन अर्धा काळ लोटल्यानंतर शैक्षणिक साहित्य हाती पडत होते.

Educational materials will be available in time | शैक्षणिक साहित्य वेळेत मिळणार

शैक्षणिक साहित्य वेळेत मिळणार

Next

ठाणे : मागील तीन ते चार वर्षे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरु होऊन अर्धा काळ लोटल्यानंतर शैक्षणिक साहित्य हाती पडत होते. परंतु यंदा शालेय विद्यार्थ्यांना शाळा सुरु होताच, शैक्षणिक साहित्य हाती पडणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे, यासाठी २० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना बंद झालेली शेंगदाणा चिक्की पुन्हा चाखण्याची संधी मिळणार आहे.
ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या आनगोंदी कारभारामुळे गेली तीन ते चार वर्षे विद्यार्थ्यांच्या हाती उशिराने शैक्षणिक साहित्य पडत होते. यापूर्वी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाचा कारभार हा शिक्षण मंडळामार्फत सुरु होता. परंतु त्यांच्याकडून होणाऱ्या दिंरगाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन त्यांच्याकडील हा कारभार काढून तो समाज विकास विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला होता. परंतु या विभागानेसुध्दा तब्बल दोन वर्षे विद्यार्थ्यांच्या हाती उशिराने शैक्षणिक साहित्य दिले. काही वेळेस दोन परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य पडले होते. पावसाळा सपंल्यानंतर रेनकोट, बुट हे साहित्यही हाती पडले होते. त्यामुळे शिक्षण विभाग चांगलाच चर्चेत आला होता. शिक्षण विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने बाहेरुन शैक्षणिक साहित्य विकत घ्यावे लागत होते. त्यामुळे हा कारभार थेट आयुक्तांनीच आपल्या हाती घेतला होता. परंतु मागील वर्षी पालिकेची आर्थिक स्थिती खालावल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा उशिरानेच शैक्षणिक साहित्य हाती पडले. दरम्यान, आता यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना विविध कल्याणकारी योजने अंतर्गत साहित्य पुरवठा करण्याकामी निविदा मागविल्या आहेत. तसेच यासाठी अंदाजपत्रकात २० कोटींची तरतूद यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यानुसार आता या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजुर झाल्यास, येत्या महिनाभरात विद्यार्थ्यांच्या हाती हे शैक्षणिक साहित्य पडणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

पुन्हा मिळणार शेंगदाणा चिक्की
एकूण ११ योजनापैकी प्रस्तावातील क्रमांक ४ योजनेत विद्यार्थ्यांना पौष्टीक आहाराचा पुरवठा करणे या बाबीचा अंदाजित खर्च धरण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आठवड्यातून १ दिवस राजगिरा व ५ दिवस शेंगदाणा चिक्कीचा पुरवठा करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार या संदर्भातील धोरणही महासभेत ठरविले जाणार आहे.

पाटी, पेन्सील, खोडरबर, पट्टी आदींसाठी ८५ लाख, गणवेशासाठी १ कोटी २० लाख, मुलींच्या गणवेशासाठी १ कोटी ९५ लाख, पौष्टीक आहारासाठी ८ कोटी २१ लाख, वॉटरबॅग व लंचबॉक्स ४० लाख, शुज मौजे ९५ लाख, दप्तर ८० लाख, वह्या ८९ लाख, प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका १ कोटी २५ लाख, शाळा व कार्यालय छपाई ३५ लाख आणि पीटी गणवेश व इतर साहित्य १ कोटी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी १८ कोटी ४४ लाख ८६ हजार २०२ रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

सध्या ठाणे महापालिकेच्या ८३ इमारती असून यामध्ये पूर्व प्राथमिक ६०, प्राथमिक १२७, माध्यमिकच्या ८ शाळा आहेत. या शाळांमध्ये ३२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, यामध्ये मुलींची संख्या १६ हजार ९७३ एवढी असून १०४७ शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.

Web Title: Educational materials will be available in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.