शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचीही ज्ञान अद्ययावत होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 06:21 PM2020-09-05T18:21:54+5:302020-09-05T18:22:25+5:30

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शतकमहोत्सवी वर्षातील शिक्षकदिन सोहळ्यात जावडेकर यांचे प्रतिपादन 

The educational policy will update the knowledge of the students as well as the teachers | शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचीही ज्ञान अद्ययावत होणार

शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचीही ज्ञान अद्ययावत होणार

Next

मुंबई :  नवीन शैक्षणिक धोरणात केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांचेही ज्ञान अद्ययावत केले जाणार आहे. शिक्षकांसाठी चार वर्षांचा एकात्मिक बी.एड. अभ्यासक्रम असेल. यात प्रत्यक्ष शिकवण्याच्या अनुभवावर भर देण्यात आला आहे. अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. मुंबई येथील पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शतकमहोत्सवी वर्षातील शिक्षकदिन कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी "नवीन शैक्षणिक धोरण" या विषयावर ते शनिवारी बोलत होते.

३४ वर्षानंतर बदल केलेल्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होऊन, संशोधन आणि विकासवृत्तीला चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. नवीन शैक्षणिक धोरणामुळे एकूण पटनोंदणीचे प्रमाण १० वर्षांमध्ये दुप्पटीने वाढेल, असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणामुळे पटनोंदणी वाढेल. सध्या ५० लाख ते २ कोटी मुले शाळेबाहेर आहेत. त्यांना राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था, खुल्या शाळांच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येईल. आकडेमोड आणि लिहिणे-वाचणे याकडे लक्ष दिले जाणार. यामुळे सर्वांना शिकण्याची संधी मिळेल अशी माहिती  सोहळ्यादरम्यान दिली. 

डॉ कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रागतिक शैक्षणिक धोरण तयार केले आहे. पूर्वी असणारी १०+२ शिक्षणपद्धती आता,५+३+३+४ अशी करण्यात आली आहे.३-८ वर्ष वयोगटातील बालकांसाठी कृतीतून शिक्षण यावर भर दिला आहे. मुलांची उत्सुकता शोधून त्यांना संशोधनासाठी प्रोत्साहित करणे, याकडे लक्ष दिले जाणार आहे. दुसरीपर्यंत एक विशिष्ट अभ्यासक्रम तयार करण्याचे काम एनसीईआरटी करत आहे. यात अंगणवाडी शिक्षिका/सेविकांचे कौशल्य अद्ययावत करण्यात येणार आहे.  पाचवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून द्यावे असा आग्रह, इयत्ता सहावी ते आठवीमध्ये विषयाची ओळख आणि व्यावसायिक शिक्षणाची संधी, कौशल्यविकासाकडेही लक्ष पुरवणे, इयत्ता नववी ते बारावीमध्ये विषयांची लवचिकता हे मुद्दे त्यांनी अधोरेखित केले. तसेच कला, वाणिज्य आणि विज्ञानशाखेचे विद्यार्थ्यांना सर्व शाखांतील विषय निवडीची मुभा, मोजकाच पण उपयुक्त अभ्यासक्रम याकडे ही तयांनी लक्ष वेधले. सध्या असलेल्या ३००० अटल टिंकरींग लॅबच्या माध्यमातून शोधाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. हाच धागा पुढे नेऊन हॅकेथॉनसारखे उपक्रम आणि वैज्ञानिक दृष्टीकोनामुळे ‘आत्मनिर्भर भारत’अभियानाला चालना मिळेल असे त्यांनी म्हटले. 

उच्च शिक्षणाचा पायाच मुळी संशोधन आणि नवकल्पना आहे. उच्च शिक्षण नव्या पद्धतीचे अर्थवाही शिक्षण असेल. यातून विद्यार्थ्यांची विचारक्षमता, विश्लेषणक्षमता, रोजगारक्षमता वाढेल, असे जावडेकर यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक धोरण प्रगतीशील आहे. न्याय देणारे हे धोरण आहे. शतकानुशतके ज्या भारताचे स्वप्न पाहिले, ते साकार करण्याच्या दृष्टीने हे धोरण आहे. सर्वांनी याचे स्वागत केले आहे. शालेय शिक्षणाबरोबरच मजबूत संशोधन संस्कृतीसाठी ते महत्त्वपूर्ण आहे, असे जावडेकर म्हणाले. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गानू यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ स्नेहलता देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.

Web Title: The educational policy will update the knowledge of the students as well as the teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.