मुंबई - जागतिक स्तरावर गौरविण्यात आलेल्या धारावी पॅटर्नचा प्रभाव अद्याप कायम आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेचा प्रसार रोखणाऱ्या या मॉडेलच्या यशाचे कथन करणारे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा धारावीने शून्य बाधित रुग्ण असण्याचा विक्रम कायम ठेवला. या भागात सध्या दहा सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान जुलै २०२० नंतर धारावीत कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला. दुसऱ्या लाटेदरम्यान धारावीतील इमारतींमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली होती. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा सर्वांची चाचणी सुरू केली. मुंबईतील अन्य विभाग हॉट स्पॉट बनले असताना, धारावीत संसर्गाची साखळी तोडण्यात महापालिकेला यश आले.
आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत आहे. मागील काही दिवसात काही विभागामध्ये रुग्णसंख्येत वाढ होतानाही दिसून येत आहे. जी उत्तर विभागांतर्गत असलेल्या माहीम आणि दादर विभागातही रुग्णसंख्या वाढली आहे. मात्र, धारावीमध्ये अद्यापही कोरोनाचा प्रसार नियंत्रणात असल्याचे दिसून येते. आतापर्यंत २० वेळा या भागात एकही बाधित रुग्ण सापडलेला नाही.
जी उत्तर विभागातील आजची स्थिती...
परिसर...आजचे बाधित...एकूण रुग्ण...सक्रिय...डिस्चार्ज
धारावी...०.....७०५८....१०......६६३१
दादर....०३....१०११५..६८...९७४४
माहीम...०४...१०४६५...११०....१००८६
धारावी मॉडेलचे यश...
कोविडचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. केंद्र सरकार, जागतिक बँक, जागतिक आरोग्य संघटना आणि विदेशातही धारावी मॉडेलचे कौतुक करण्यात आले आहे. धारावी मॉडेल म्हणून ही कार्यपद्धती अन्य देशामधील अशा दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टीमध्येही अवलंबण्यात येत आहे. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही धारावी मॉडेलने आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे.