Join us

मुंबईकरांनो, घशाची लागेल वाट, ही काळजी घ्या..! वातावरणातील प्रदूषणाचा होतोय परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 10:02 AM

उष्मा व गारव्याच्या लपंडावामुळे मुंबईत संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले असतानाच आता घसादुखीमुळेही मुंबईकर हैराण झाले आहेत.

मुंबई : उष्मा व गारव्याच्या लपंडावामुळे मुंबईत संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले असतानाच आता घसादुखीमुळेही मुंबईकर हैराण झाले आहेत. नाकातून पाणी येणे, घसा दुखणे, गिळताना त्रास होणे, घसा बसणे यासारख्या समस्या त्यांना भेडसावत आहेत. अनेकांचा घसा खोकून लाल झाल्यामुळे अन्न गिळण्यास त्रास होत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, वातावरणातील प्रदूषणामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला आहे.

खासगी दवाखान्यातील जनरल फिजिशियन आणि सार्वजनिक रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात सध्या या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या अशा परिस्थिती काही नागरिक डॉक्टरांचा सल्ला घेत आहे तर काही जण स्वतःच मेडिकलमधून काही उपलब्ध असलेल्या गोळ्यांचा वापर करून स्वयंउपचार करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी हवा प्रदूषित झाल्यामुळे प्रतिबंधक उपाय करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली होती. त्याचाच एक भाग म्हणून आजही काही भागांत पाण्याने रस्ते धुतले जात आहेत. तसेच राडारोडा वाहणाऱ्या वाहनांवर आच्छादन टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.   दोन ते तीन दिवसांकरिता ज्येष्ठ नागरिक, मुले आणि नागरिकांना ताप, सर्दी, खोकल्याच्या लक्षणांना सामोरे जावे लागत आहे. 

प्रदूषणामुळे होणाऱ्या ॲलर्जीमुळे नागरिकांना सर्दी होते. त्यानंतर ती सर्दी घशात उतरून नागरिकांना खवखवीचा त्रास सुरू होतो. यामुळे काही नागरिकांना तापसुद्धा येतो. सध्या व्हायरलची (विषाणू) साथ सुरू आहे. त्यामुळे काही वेळा रुग्णांना थकल्यासारखे वाटते. जर या अशा परिस्थितीत नागरिकांना ताप येत असेल तर त्यांनी विश्रांती घेणे गरजेचे आहे. तसेच योग्य वेळी डॉक्टरांना दाखवून वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी जास्त तेलकट, तिखट खाऊ नये. तसेच शक्य झाल्यास कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात. - डॉ. शशिकांत म्हशाळ, सहयोगी प्राध्यापक, कूपर

रुग्णालयात सध्या मोठ्या प्रमाणात साथ सुरू आहे. घशामध्ये संसर्ग झाल्यामुळे त्याचा परिणाम फुप्फुसाच्या खालच्या बाजूने होत असून, खोकल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे या काळात नागरिकांनी स्वतःची प्रतिकार शक्ती चांगली कशी ठेवता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण, विषाणूची साथ असल्यामुळे काही लोकांचा खोकला हा सात ते आठ दिवस राहिल्याने घसा लाल होत आहे. -डॉ. श्रीनिवास चव्हाण, विभागप्रमुख, कान-नाक-घसा विभाग, जे. जे. रुग्णालय

टॅग्स :मुंबईहेल्थ टिप्स