मुंबई : आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण संस्थेने, अमेरिकन इंडिया फाउंडेशनसोबत गुरुवारी महत्त्वपूर्ण शैक्षणिक सामंजस्य करार केला. विद्यापीठाच्या फिरोजशहा मेहता व्यवस्थापन परिषदेच्या दालनात या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. या करारामुळे आर्थिक मागास विद्यार्थ्यांना माफक दरात प्रशिक्षण घेता येणार आहे.या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले की, या करारामुळे अमेरिका इंडिया फाउंडेशनच्या मदतीने गरवारे व्यवसाय शिक्षण संस्थेमार्फत आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील होतकरू तरुण विद्यार्थ्यांना व्यावसायाभिमुख प्रशिक्षण देण्यात येईल. त्यातून हे विद्यार्थी त्यांच्या पायावर उभे राहतील. करारानुसार पहिल्या टप्प्यात स्टोअर आॅपरेशन असिस्टंट, सॉफ्टवेअर टेस्टिंग, पेंट केमिस्ट असे तीन अभ्यासक्रम सुरू केले जातील.दरम्यान, प्रशिक्षणासाठी अपेक्षित खर्च अमेरिकन इंडिया फाउंडेशन करणार आहे. स्टोअर आॅपरेशन असिस्टंट, सॉफ्टवेअर टेस्टिंग आणि पेंट केमिस्ट या तीनही अभ्यासक्रमांना नोव्हेंबर २०१६ पासून सुरुवात होणार असून, तिन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी सहा महिने एवढा आहे. प्रत्येकी ४० विद्यार्थी एवढी प्रवेश क्षमता असलेल्या या अभ्यासक्रमासाठी वर्षातून दोनदा प्रवेशप्रक्रिया राबवली जाईल. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यासोबत अमेरिकन इंडिया फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलेक्स कॉऊन्ट, संचालक निशांत पांडे, सल्लागार हनुमंत रावत, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. ए. खान, बीसीयूडी संचालक डॉ. अनिल पाटील आणि गरवारे व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. अनिल कर्णिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ईबीसी विद्यार्थ्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2016 4:02 AM